इन्सुली बिलेवाडीत ‘ओंकार’ हत्तीचा धुमाकूळ; दुचाकीचा चक्काचूर!
नुकसान झाल्यानंतर जबाबदार कोण? ग्रामस्थांचा वनविभागाला संतप्त सवाल; गावात हत्ती नको, ग्रामस्थ आक्रमक
इन्सुली, बिलेवाडी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली बिलेवाडी परिसरात ओंकार हत्तीने पुन्हा एकदा धुमाकूळ घालत एका दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हत्तीच्या वाढत्या उपद्रवामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाच्या उपाययोजनांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
बिलेवाडी येथील फिलिप्स रॉड्रिक्स हे नदीमध्ये मासेमारीसाठी गेले असताना त्यांनी आपली अॅक्टिव्हा दुचाकी शेजारील घराजवळ उभी केली होती. याच दरम्यान ओंकार हत्तीने दुचाकीवर हल्ला करत तिचा अक्षरशः चक्काचूर केला. दुचाकीच्या नुकसानीचा आवाज ऐकून शेजारी राहणारे अनिल सावंत आणि समीर सावंत यांनी घटनास्थळी धाव घेत आरडाओरड केली. त्यांच्या आवाजामुळे हत्ती तेथून बाजूला गेला, अन्यथा आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
ओंकार हत्तीने संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला असून, त्याच्या हालचालींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. मात्र, या समस्येवर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास शासन आणि वनविभाग अपयशी ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
‘नुकसान झाल्यावर जबाबदार कोण?’
हत्ती गावात दाखल झाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक असलेली आधुनिक साधने, विशेषतः ड्रोन कॅमेऱ्यांची सुविधा वनविभागाकडे उपलब्ध नसल्याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
हत्ती नजर चुकवून दुसऱ्या ठिकाणी गेल्यास त्याचा माग कसा काढायचा? वस्तीमध्ये हत्ती दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी स्वतः सतर्क राहायचे, जीव धोक्यात घालायचा; मात्र वनविभागाकडे आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल उपस्थित करण्यात आला.
‘जनतेची झोप उडाली, अधिकारी मात्र आरामात!’
हत्तीच्या दहशतीमुळे गावातील नागरिक रात्री जागून काढत आहेत. आपल्या घराजवळ, शेतात किंवा रस्त्यावर हत्ती कधी दाखल होईल, याची भीती प्रत्येकाच्या मनात आहे. सामान्य नागरिकांच्या जीविताचा आणि मालमत्तेचा प्रश्न निर्माण झाला असताना संबंधित अधिकारी मात्र वातानुकूलित कार्यालयांमध्ये आरामात बसून आहेत, अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी ड्रोन कॅमेरे, प्रशिक्षित कर्मचारी, प्रभावी गस्त आणि तातडीची प्रतिसाद यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
‘आमच्या गावात हत्ती दिसता कामा नये!’
ओंकार हत्तीच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या बिलेवाडी ग्रामस्थांनी वनविभागाला स्पष्ट इशारा दिला आहे. आमच्या गावात हत्तीचा प्रवेश होऊ नये, तसेच नागरिकांच्या जीविताला किंवा मालमत्तेला नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागाने घ्यावी. वारंवार होणाऱ्या या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यास ग्रामस्थ शांत बसणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
वन्यप्राण्यांच्या संरक्षणाबरोबरच सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही शासन आणि वनविभागाची आहे. हत्तीच्या उपद्रवामुळे नागरिकांचे जीवन भयभीत झाले असताना, प्रशासनाने आता तरी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बिलेवाडी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
ओंकार हत्तीच्या धुमाकुळावर कायमस्वरूपी उपाय कधी? आणि सामान्य नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.
