*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूहाच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम ललित लेख*
*हवाय…फक्त एकच*
*गरीबों की सुनो, वो तुम्हारी सुनेगा*
*तुम एक पैसा दोगे, वो दस लाख देगा*
असं गाणं गात फिरून भीक मागणाऱ्या बेवारस, बेघर भिकाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या झोळीत सापडले रुपये साडेतीन लाख!
आलिशान बंगल्यात राहणाऱ्या एकाकी वृद्ध स्त्रीच्या मृतदेहाची तीन दिवसांनंतर खबर, एकुलत्या एक मुलाचा वेळेअभावी अंत्यविधीस येण्यास नकार, शेजाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार!
कोट्याधीश बापाला मुलाने काढले घराबाहेर, दोन वेळच्या खाण्याची भ्रांत!
काय मंडळी! दररोजच्या वर्तमानपत्रात येणाऱ्या ह्या बातम्या ओळखीच्या वाटताहेत ना! कधी त्या बातम्यातील नावं बदलतात, तर कधी त्यांचं स्वरूप, मथितार्थ मात्र एकच.
चहा पिता पिता या बातम्यांवरून एक नजर फिरवून, जराशी हळहळ करून, त्या मुलांना दोष देऊन तुम्ही पान उलटता आणि पुढच्या क्षणाला ते विसरूनही जाता. पण….त्याचवेळी आपल्या पायाखालीही काय जळतंय याकडे तुमचं लक्ष असतं ना!
आजकाल एक राजपुत्र आणि एक राजकन्या किंवा एकच राजपुत्र आणि एकच राजकन्या किंवा थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती. आणि ही सर्व भाग्यवान मंडळी सोन्याचा चमचा तोंडात धरूनच जन्माला येतात किंवा तुम्हीच नंतर तो त्यांच्या तोंडात देता. मग त्या सोन्याच्या चमच्याला साजेशी परिस्थिती नसली तर ती निर्माण करण्यासाठी तुम्ही आपल्याच जीवाचं रान करता. आणि त्या रानात हे भाग्यवान जीव मात्र स्वच्छंदपणे बागडत असतात. त्यांना ऊन, पाऊस, थंडीची झळ लागू नये, त्या उजाड रानात नंतर त्यांच्या कृपेची सावली मिळावी म्हणून तुम्ही दमछाक होईपर्यंत पळतच राहता आणि विसरून जाता की…
*पूत सपूत होय तो खुद ही ले कमाय*
*गर कपूत होय तो सबकुछ दे गमाय*
अशावेळी मला एका राजाची आणि एका सामान्य माणसाची गोष्ट आठवते. राजाकडे काहीतरी मागणं मागण्यासाठी आलेल्या माणसाला राजा ‘सूर्यास्तापर्यंत पळशील तेवढी जमीन तुझी’ असं सांगतो आणि तो ‘आणखी थोडी, आणखी थोडी’ म्हणत धावतच राहतो. अखेर सूर्याच्या शेवटच्या किरणासोबतच त्याच्याही जीवनाचा अस्त होतो. धावून कमावलेल्या जमिनीपैकी फक्त त्याच्यापुरती साडेतीन हात जमीनच त्याला पुरेशी होते. सूर्याला पुन्हा उगवण्यासाठी दुसरा दिवस तरी असतो, पण तुमचं काय!
याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही आपल्या मुलांना वाऱ्यावर सोडून द्यायचं. तुम्ही जन्म दिलाय तर त्यांचं संगोपन करणं आणि त्यांच्या पंखात बळ भरणं हे अर्थातच तुमचं कर्तव्य आहे. पण तुमच्या कर्तव्यांबरोबरच त्यांना त्यांच्याही कर्तव्याची जाणीव व्हायलाच हवी, फक्त हक्कांची नव्हे आणि नसेल तर ती तुम्ही करून द्यायला हवी. अशावेळी एका मर्यादेपर्यंत तुम्ही पशुपक्ष्यांचा आदर्श घ्यायला हरकत नसावी.
*या पैशाच्या बादशहाला दुनिया करी सलाम रे*
*दाम करी काम वेड्या, दाम करी काम*
या उक्तीप्रमाणे श्रीमंत भावाच्या आधी गरीब असलेल्या आणि नंतर श्रीमंत झालेल्या बहिणीची
कहाणी जशी सर्वश्रुत आहे, तसेच आई-वडिलांच्या हयातीत किंवा त्यांच्या पश्चात इस्टेटीसाठी सख्खे भाऊ-बहिणी पक्के वैरी झाल्याचेही दृश्य पहायला मिळते. अर्थात अपवाद सर्वत्र असतातच. तसेच चंचल असलेल्या लक्ष्मीला अडवून ठेवण्याकरिता घरातली गृहलक्ष्मी कधीच परत न येण्यासाठी मागच्या दाराने बाहेर पडते, या आशयाचा ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’ हा सिनेमाही तुमच्यापैकी जुन्या पिढीतील लोकांना पाहिल्याचं आठवत असेल.
माझ्यातील चढउतार हा तर जणू जीवन मरणाचा प्रश्न असणाऱ्या व्यापारी, ‘लिधो, आपो’ अशा आरोळ्या ठोकणाऱ्या शेअर बाजारातील मंडळी आणि तत्सम व्यक्तींचा जिव्हाळ्याचा विषय.
माझ्या निवासस्थानांतील विषमतेची दरी पाहून तुमच्यापैकी काही जणांचं मन विषण्ण होतं खरं.पण हे प्रत्येकाच्या संचिताचं फळ असतं बाबांनो…
‘जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ’
म्हणुनच तर कुठे मी भरभरून वहात असतो तर कुठे माझ्या पुसटश्या स्पर्शाचाही अभाव. अशावेळी
*इस धरती पर आये है तो, कुछ तो पुण्य कमाना है*
*खाली हाथ आये है* *और खाली हाथ जाना है*
हे अंतिम सत्य लक्षात ठेवुन आपल्याजवळील ओसंडून वाहणाऱ्यातला एखादा कण सुद्धा अभावग्रस्ताच्या अन्न, वस्त्र, शिक्षण, निवाऱ्याची गरज भागवू शकतो याची कृतीशील जाणीव ठेवली तरी त्या संचिताचं पुरेपूर माप त्यांना भेटल्याशिवाय रहाणार नाही.
*इथे कधी रावाचा होतो रंक आणि* *रंकाचा होतो राव*
*आपापल्या मगदूराप्रमाणे मिळतो* *प्रत्येकाला भाव*
पण यात माझी काहीच भूमिका नाही बरं, आपल्या कर्माला आपल्या प्रयत्नांची जोड देण्या न देण्याचाच हा परिणाम असतो सारा!
म्हणुनच जसे माझ्यामुळे लाभणाऱ्या सौख्याचा उपभोग घेतांनाही ‘इदंम् न मम’ असं म्हणत कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहुन आपल्या दानाचा सुगंध दरवळवणारे महाभाग असतात तसे माझ्या संगतीमुळे उद्धटपणाचे, उर्मटपणाचे, इतरांना तुच्छ लेखणारे, व्यसनी, गर्विष्ठ पुतळेही असतातच.
त्याच्या परिणामांची त्यांना कल्पना नसते त्याला मी तरी काय करणार!
नाण्याला दोन बाजू असतात असं तुम्ही म्हणता. म्हणजे मलाच हो…कळलं ना आता! पण काळानुसार आणि प्रदेशांनुसार बदलणारी नावं आणि स्वरूप आणि मोल मात्र वेगवेगळं! होन, मोहोर, मुद्रा, शिवराई, खडकु, पै, ढब्बू पैसा, चवली, पावली आणि विदेशातील डॉलर, पौंड, युरो, येन, दिनार, इत्यादी.
आणि जेव्हा मला पैसा, संपत्ती, धन, लक्ष्मी, अशा अनेक नावांनी संबोधलं जातं तेव्हा त्याचे अनेकानेक बरे वाईट पैलू, पदर उलगडले जातात. असं हे माझं कालातीत माहात्म्य! त्याबद्दल नंतर कधीतरी बोलू. सध्या मला त्या समोरच्या प्रासादतुल्य बंगल्यातून काढता पाय घेऊन त्याच्या बाजूच्या झोपडीत जरा डोकवायचंय.
पण जाता जाता एकच सांगावसं वाटतंय…शेवटी तुमच्या हातातील ९९ रुपयाचे १०० होण्यासाठी कमी असलेल्या एका रुपयाच्या हावेसाठी एखादी तरी लक्ष्मणरेषा हवीच नाही का!
भारती महाजन-रायबागकर
चेन्नई/ नाशिक
9763204334