You are currently viewing सिंधुदुर्गातील शिक्षकांचे प्रश्न वर्षभरात सोडविणार – शिक्षक आम. ज्ञानेश्वर म्हात्रे

सिंधुदुर्गातील शिक्षकांचे प्रश्न वर्षभरात सोडविणार – शिक्षक आम. ज्ञानेश्वर म्हात्रे

मालवण

शिक्षक आमदार बनल्यावर आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षकांचे सर्व प्रश्न मांडले. शिक्षक पेन्शन व इतर प्रश्नांबाबत आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली असून प्रश्न सोडविण्यासाठी ते सकारात्मक आहेत. आमदार बनल्यावर आपण कोकणला व विशेषतः सिंधुदुर्गला प्राधान्य दिले असून सिंधुदुर्गातील शिक्षकांचे प्रश्न वर्षभरात आपण सोडविणार, अशी ग्वाही शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी येथे बोलताना दिली.

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आज मालवण येथील टोपीवाला हायस्कुलला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी टोपीवाला हायस्कुलतर्फे तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे विजय केनवडेकर, गणेश कुशे, टोपीवाला हायस्कुलचे मुख्याध्यापक डी. एस. खानोलकर, पर्यवेक्षक श्री. प्रभूखानोलकर, वामन तर्फे, जयवंत ठाकूर, गुरूदास कुसगावकर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

यावेळी आम. ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले, भ्रष्टाचाराच्या आपण विरोधात असून शिक्षण विभागात एजंट माणसे माझ्या आजूबाजूला नको आहेत. शैक्षणिक कार्यालये भ्रष्टाचार मुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे. आपण स्वतः शिक्षक असल्याने शिक्षकांच्या प्रश्नांची आपणास चांगली जाण आहे. राज्यभरातील शिक्षकांच्या समस्या आपण जाणून घेत आहोत. शिक्षकांना त्रास झाल्यास गाठ आपल्याशी आहे असा इशारा आपण यापूर्वीच दिला आहे. शाळांमध्ये कला व क्रीडा शिक्षक आवश्यक आहेत. नवीन शैक्षणिक धोरणात कला क्रिडेला वाव दिला गेला आहे, मात्र त्यासाठी लागणारे साहित्य देखील शाळांना पुरविण्यात यावे अशी मागणी आपण शासनाकडे केली आहे. तसेच टोपीवाला हायस्कुलसारख्या शंभर वर्ष पूर्ण केलेल्या शाळांना जिल्हा नियोजन मधून ५० लाखांचा निधी देण्यात यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच शिक्षक आमदार म्हणून आपण शाळांना ई लर्निंग साठी संगणक देणार आहोत, असेही आम. म्हात्रे यावेळी म्हणाले. यावेळी विजय केनवडेकर, मुख्याध्यापक खानोलकर, प्रभूखानोलकर यांनीही विचार मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा