You are currently viewing आंबा-काजू पीक विमा हप्ता २७ नोव्हेंबर पूर्वी भरा – सतीश सावंत

आंबा-काजू पीक विमा हप्ता २७ नोव्हेंबर पूर्वी भरा – सतीश सावंत

सिंधुदुर्ग
सध्याच्या बदलत्या हवामानाचा विचार करता आंबा – काजू पिकासाठी विमा संरक्षणाची शेतक-यांना आवश्यकता आहे. हा विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2020 असून शेवटचे तीन दिवस सुट्टी असल्याने शेतक-यांना विमा हप्ता भरण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शेतक-यांनी 27 नोव्हेंबर 2020 पूर्वी विमा हप्ता भरावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.
प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजनेंतर्गत कोकणातील आंबा व काजू या दोन प्रमुख पिकांचा समावेश होतो. गेल्या चार ते पाच वर्षात हवामानातील बदलामुळे उत्पादनात विपरीत परिणाम होत आहे. मात्र फळ पिक विमा योजनेमुळे शेतक-यांच्या उत्पादनास काही अंशी मदत होत आहे. राज्य शासनाने 5 जून 2020 अन्वये चालू वर्षीसाठी हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजना जाहीर करतांना काही निकषांमध्ये बदल केला आहे. चालू वर्षी निकषांमध्ये करण्यात आलेले बदल हे आंबा उत्पादक शेतक-यांवर अन्यायकारक असल्याने त्यात बदल होण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न करण्यात आले आहेत. संबंधित विषय हा केंद्र शासनाशी निगडीत असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संचालक व्हिक्टर डान्टस व विकास सावंत यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा खासदार शरद पवार यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर या विषयानुषंगाने सह्याद्री अतिथी गृह, मुंबई येथे खास सभा आयोजित करण्यात आली. या सभेत फळ पिक योजनेबाबत संबंधित अधिका-यांनी सविस्तर माहिती दिली.
चालू वर्षापासून केंद्राने पिक विमा योजना शेतक-यांसाठी ऐच्छिक केली असून आपला विमा हप्त्यातील सहभाग मर्यादित केला आहे. योजनेतील सध्याच्या निविदा रद्द करण्याबाबत राज्य शासनाने केंद्राकडे विनंती केली आहे. मात्र त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. हवामानातील निकष हे आंबा पिकाबरोबरच केळी पिकासाठीही अडचणीचे असून राज्य शासन यासाठी स्वतंत्र विमा निकष योजना राबविण्याच्या विचाराधिन असून त्यादृष्टीने राज्य शासनाचे काम सुरू आहे. परंतु त्याला काही कालावधी लागणार आहे. मात्र चालू वर्षी शासनाकडील सुधारीत निकषांनुसार अवेळी पाऊस 1 एप्रिल ते 15 मे या कालावधीत 25 मि.मी. व 1 मार्च ते 15 मे या कालावधीत 37 डिग्रीपेक्षा जास्त तापमान विचारात घेऊन विमा योजनेत शेतक-यांना सहभागी व्हावे लागणार आहे. सध्याच्या बदलत्या हवामानाचा विचार करता आंबा काजू पिकासाठी विमा संरक्षणाची शेतक-यांना फार आवश्यकता आहे. कर्जदार शेतक-यांनी कलम बाग असलेल्या ठिकाणचा जिओ टॅगिंग फोटो मागाहून दिल्यास चालू शकेल. विमा हप्ता भरण्याची 30 नोव्हेंबर अंतिम तारीख असून शेवटचे तीन दिवस सुट्टी असल्याने शेतक-यांनी 27 नोव्हेंबर पूर्वी विमा हप्ता भरावा असे आवाहन जिल्हा बॅक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × five =