You are currently viewing दिपावलीची फक्त पाच दिवसाची सुट्टी देऊन शासनाकडून शिक्षकांची क्रुर चेष्टा!

दिपावलीची फक्त पाच दिवसाची सुट्टी देऊन शासनाकडून शिक्षकांची क्रुर चेष्टा!

शुक्रवारी शिक्षक भारतीच्यावतीने राज्यभर परीपत्रकाची होळी करून करणार निषेध!

तळेरे:

आज शालेय शिक्षणमंत्र्यांनी 12 ते 16 नोव्हेंबर फक्त पाच दिवसाची दिपावली सुट्टी जाहीर केलेलं परिपत्रक काढले असून गेले सात-आठ महिने राज्यातील शिक्षक इमानेइतबारे जीव धोक्यात घालून कोरोनाची ड्युटी केली जवळ जवळ ८ महिने त्यांना आपल्या गावी कुटुंबाकडे जाता आले नाही. अशा परिस्थितीत फक्त पाच दिवस सुट्टी जाहीर करून शिक्षकांची अवहेलना करण्याचं काम या शासनाने केले असून शिक्षकभारतीच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. उद्या शुक्रवारी राज्यभर या परिपत्रकाची होळी करीत निषेध केला जाणार असल्याची माहिती राज्यप्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर यांनी दिली आहे.
लाॅकडाऊन व कोरोना काळातील शासनाचे शिक्षणविषयक अनिश्चित धोरण, कोणत्याही प्रकारच्या ठोस धोरणाचा अभाव हाच कारणीभूत असून तुम्हाला सुट्टी दिली आहे की,तुम्ही शाळेत जायचं आहे की, घरूनच काम करायचं आहे. याचे कुठेही योग्य मार्गदर्शन झाले नाही. शिक्षक व कर्मचा-यांनी आपले मुख्यालय सोडायचे नाही एवढाच आदेश वरिष्ठांकडून आला होता.त्यामुळे बिचारे शिक्षक जीव धोक्यात घालून कोरोनाच्या ड्युटी करत राहीले व त्याबरोबरच आॅनलाईन शिक्षणाचा रथ हाकत राहिले.शिक्षकांनी आपल्या कर्तव्यात कुठेही कसूर केलेली नाही उलट सलग सात ते आठ महिने शिक्षकांची ड्युटी सुरू आहे निदान याची तरी दखल शासनस्तरावर घेणे गरजेचे होते. मे महिन्याच्या सुट्टीत तसेच गणेश चतुर्थीच्या सुट्टीतही कोरोनाची ड्युटी शिक्षकांनी केली असे असतानाही शासनाने दीपावलीची फक्त पाच दिवसाची सुट्टी जाहीर करून शिक्षकांची क्रुर चेष्टा करण्याचा प्रकार केला आहे. जिल्हास्तरावर यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त आठ दिवसाचीच सुट्टीचे नियोजन झाले होते व त्याला शिक्षकही राजी होते.मात्र आज गुरुवारी महाराष्ट्र शासनाने फक्त पाच दिवसाची सुट्टीचे परिपत्रक काढून राज्यातील शिक्षकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे अशी संतप्त भावना शिक्षक भारतीचे राज्य प्रमुख कार्यवाह श्री. संजय वेतुरेकर यांनी व्यक्त केली आहे.
शिक्षकांनी उन्हाळ्याची सुट्टी क्वारंटाईनच्या कक्षावर ड्युटी करण्यात घालवली. काहीजण नाक्यांवर पोलिसांसोबत सर्वेक्षण करत होते .आपल्या ड्युटीच्या ठिकाणापासून सुमारे 40 ते 50 किलोमीटर अंतरावरही काही शिक्षक कामगिरीवर गेले .परंतु त्याचा कोणताही टी.ए.डी.ए.त्यांना मिळाला नाही. आणि हायवेवर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचे सर्वेक्षण केले .कोरोनाचा जीवाला धोका असूनही स्वतःचा जीव त्यांनी धोक्यात घातला. त्यातही नाईट ड्युटी होती.काही शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तर कोरोनाची लागण होऊन ते स्वर्गवासी झाले.
तरीही राष्ट्रीय आपत्ती निवारण कार्यात शिक्षकांनी झोकुन देत काम केले आहे.
या सर्व बाबींचा विचार करता शासनाने या परिपत्रकात त्वरित बदल करून दिपावलीची किमान १२दिवसाची रजा जाहीर करावी. किंबहुना जिल्हास्तरावर सुट्टीबाबत निर्णय घेण्याची मुभा शिक्षणाधिकारी यांना देण्यात यावी अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − four =