You are currently viewing पाट तलाव सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा

पाट तलाव सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा

पाट तलाव सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा

आ. निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन; ‘जागतिक दर्जाचा प्रकल्प उभारणार’ अशी ग्वाही

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील निसर्गरम्य पाट तलावाच्या सुशोभीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, आमदार निलेश राणे यांच्या हस्ते या विकासकामाचे दिमाखात भूमिपूजन करण्यात आले. २०२५-२६ या आर्थिक वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, कामासाठी प्रारंभी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना आमदार निलेश राणे राणे म्हणाले, “पाट तलावाचा प्रकल्प जागतिक दर्जाचा करण्याचा आमचा निर्धार आहे. दिलेला शब्द पाळणारच. ५ कोटी हा केवळ प्रारंभिक निधी असून, प्रकल्पासाठी आवश्यकतेनुसार वाढीव निधीही उपलब्ध करून दिला जाईल.”

गेल्या काही काळापासून रखडलेल्या या कामाबाबत त्यांनी भूतकाळातील अडचणींवर भाष्य करताना, “हे काम कोणामुळे रखडले हे महत्त्वाचे नाही. आता हा प्रकल्प पूर्णत्वास नेणे हेच आमचे लक्ष्य आहे,” असे स्पष्ट केले.

विकासकामांना गती देण्याचे आश्वासन

पाट तलावासह संपूर्ण परिसराचा विकास करण्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अंतर्गत प्रलंबित असलेल्या विकासकामांच्या याद्या तातडीने सादर करण्याचे आवाहनही त्यांनी प्रशासनाला केले. ही सर्व कामे मार्गी लावून जनतेला दिलासा दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या भूमिपूजन सोहळ्यास लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाट तलावाच्या सुशोभीकरणामुळे परिसरातील पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा