You are currently viewing १७ एप्रिल रोजी कुडाळ मध्ये बालोद्यानाचा लोकार्पण सोहळा

१७ एप्रिल रोजी कुडाळ मध्ये बालोद्यानाचा लोकार्पण सोहळा

कुडाळ :

कुडाळ तहसीलदार कार्यालयानजिक नगरपंचायतीमार्फत नव्याने साकारण्यात आलेल्या बालोद्यानाचा उदघाटन सोहळा सोमवार, १७ एप्रिल २०२३ रोजी सायं ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी खुले होणार आहे, अशी माहिती कुडाळच्या नगराध्यक्षा आफरीन करोल आणि उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी दिली.

कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांच्या वतीने नगराध्यक्षा आफरीन करोल व उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट बोलत होते. यावेळी नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेवक संतोष शिरसाट, नगरसेविका सई काळप, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेविका ज्योती जळवी, माजी नगरसेवक सचिन काळप, राकेश वर्दम आदी उपस्थित होते.

कुडाळ नगरपंचायतीत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध विकासकामे केली जात आहेत. शहरातील लहान मुलांच्या मनोरंजनासाठी ७५ लाख रूपये निधीतून तहसीलदार कार्यालयनजिक सुसज्ज बालोद्यान प्रकल्प साकारण्यात आला आहे. याठिकाणी विविध खेळणी बसविण्यात आली असून या बालोद्यानाचे काम पूर्ण झाले आहे.

या बालोद्यानाचा लोकार्पण सोहळा सोमवार, १७ एप्रिल रोजी सायं. ५.३० वाजता खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व आमदार वैभव नाईक आणि जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी लहान मुलांसाठी विविध फनी गेम्स व खेळांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहीती नगराध्यक्षा करोल व उपनगराध्यक्ष शिरसाट यांनी दिली.

नगरपंचायतीमार्फत शहरात विविध विकासकामे केली जात आहेत. बाजारपेठ आणि सांगिर्डेवाडी या दोन ठिकाणी लहान गार्डन प्रस्तावित करण्यात आले असून भविष्यात न. पं. अंतर्गत सतराही प्रभागात लहान गार्डन साकारण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. पोलिस स्टेशननजिकच्या जुन्या बालोद्यानाच्या सुशोभीकरणासाठी नगरोत्थानमधून ५ लाखाचा निधी मंजूर झाला असून लवकरच या बालोद्यानाचे सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे, असे नगराध्यक्षा करोल व उपनगराध्यक्ष शिरसाट यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा