You are currently viewing मनसेने केला महावितरणच्या बोगस कामाचा पर्दाफाश….

मनसेने केला महावितरणच्या बोगस कामाचा पर्दाफाश….

निकृष्ट काम पुन्हा नव्याने येत्या आठ दिवसात करणार वीज वितरण अभियंत्यांची मनसे कार्यकर्त्यांना दिली ग्वाही

मनसेच्या जागृकतेचे सर्व स्तरातुन होतेय कौतुक

मालवण

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफाॕर्मरचे दोन पोल उभारण्याचे काम तारकर्ली केळुसकरवाडी येथे सुरू आहे. सदर काम बोगस व निकृष्ट असल्याचे लक्षात येताच तारकर्ली येथील मनसे विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष प्रतिक कुबल यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी या कामास आक्षेप घेतला.

यासंदर्भात अधिक वृत्त असे की राज्य विद्युत वितरण कंपनी चे ट्रान्सफर उभारण्याचे काम तारकर्ली येथे केळुसकर वाडी येथे सुरू आहे. या कामासाठी पोल उभारणीस योग्य प्रतीची वाळू व खडी न वापरता समुद्राची खारट वाळू वापरली गेली आहे. सदर कामासाठी आवश्यक काॕंक्रीट मध्ये सुद्धा समुद्राचे खारे पाणी वापरले आहे. आवश्यक असलेले सोलिंग हेसुद्धा कमी प्रमाणात वापरले गेले आहे. संपूर्ण काम बोगस असल्याचे लक्षात येताच प्रतिक कुबल व स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी ही बाब मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांच्या निदर्शनास आणून दिली. इब्रामपूरकर यांनी कणकवली येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे संपर्क साधात घटनास्थळी पाचारण केले. सहाय्यक अभियंता व्ही.जी.कद्रेकर तसेच कामाचे ठेकेदार गोरे, पवार घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी तेथे उपस्थित असलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सहाय्यक अभियंता कद्रेकर तसेच ठेकेदाराला धारेवर धरत सदर काम बोगस असल्याचे निदर्शनास आणून दिले.

आक्रमक मनसे कार्यकर्यांच्या भावना लक्षात घेत श्री.कद्रेकर यांनी सदर बोगस व निकृष्ट झालेले असल्याचे मान्य केले.हे काम तातडीने काढुन टाकुन नविन काम करणार असल्याचे सांगितले.सदरील काम असलेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे येत्या आठ दिवसात पुन्हा नव्याने तुमच्या समक्ष करणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी मनविसे तारकर्ली विभाग अध्यक्ष प्रतिक कुबल,देवबाग मतदार संघ विभाग अध्यक्ष बजरंग कुबल,तारकर्ली शाखाध्यक्ष प्रसाद बापर्डेकर,मनमोहन केळुसकर,विनीत कांदळगांवकर आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांच्या जागृकतेचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा