You are currently viewing हेवाळे पुलाचे स्वप्न होणार साकार…

हेवाळे पुलाचे स्वप्न होणार साकार…

दोडामार्ग

गेल्या कित्येक वर्षांच्या हेवाळे पुलाच्या मागणीचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. या पुलासाठी नाबार्ड २५ योजने अंतर्गत २४ मार्च २०२० राज्यसरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. तब्बल ३ कोटी ४६ लाख ३५ हजार इतक्या रकमेच्या पूल बांधणीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे गेली चार पाच वर्षे अतोनात मेहनत घेणारे हेवाळे गावचे माजी सरपंच संदीप देसाई व हेवाळे ग्रामवासीयांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. दरम्यान गावच्या जीव्हाळ्याचा प्रश्न सोडविण्यात यश आल्याने मोठे समाधान व्यक्त केले आहे. आपण करत असलेल्या पाठपुराव्याला ग्रामवासीयांनीही वेळोवेळी मोठी साद दिल्याने तसेच खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर, तालुकाप्रमुख बाबुराव धुरी व सावंतवाडी बांधकाम विभागाचे अधिकारी यांसह साऱ्यांनीच साथ दिल्याने हेवाळे गावचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया माजी सरपंच संदीप देसाई यांनी दिली आहे.
यावर्षी तर पावसाळ्यात हेवाळे गावाला जोडणारा कमी उंचीचा कोजवे मधोमध पावसाळ्यात वाहून गेला होता. यावेळी तेथील ग्रामस्थांनी उपोषणही छेडले होते. मात्र २४ मार्च २०२० लाच याच वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल बांधकामाला शासनाने नाबार्डकडून मंजुरी दिली आहे. कोविड मुळे याबाबत आवश्यक आदेश येथील बांधकामाला उपलब्ध न झाल्याने व पूल मंजुरीचे प्रशासकीय मान्यतेचे पत्र मिळत नसल्याने ग्रामस्थांत मोठी नाराजी होती. मात्र सुरवातीपासून या पुलासाठी प्रयन्त करणारे माजी सरपंच व पत्रकार संदीप देसाई यांनी आपला पाठपुरावा सुरूच ठेवला. खासदार विनायक राऊत, तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर, विद्यमान पालकमंत्री उदय सामंत यांनज या पूल मंजुरीसाठी राज्यशासनाकडे शिफारस केली होती. शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस, तालुका संघटक संजय गवस, उपतालुकप्रमुख दौलत राणे, उपजिल्हासंघटक गोपाळ गवस, विभागप्रमुख संजय गवस यांसह सामाजिक कार्यकर्ते संजय नाईक यांनीही वेळोवेळो शिवसेना नेत्यांकडे या पुलप्रश्नी लक्ष वेधले होते.
बाबुराव धुरी यांच्या माध्यमातून अनेकदा माजी सरपंच यांनी संदीप देसाई यांनी मंत्रालय स्तरावर सुद्धा पाठपुरावा केला होता. तत्कालीन गृह व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून राज्याचे बांधकाम व वित्त मंत्री यांची भेट घेतली होती. शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता बच्चे, युवराज देसाई आणि उप अभियंता विजय चव्हाण यांच्या माध्यमातून सातत्याने या पुलाचा फोलउप सुरू ठेवला होता. गावात ग्रामविकासाच्या माध्यमातून अनेक अभियान, उपक्रम यशस्वी करूनही पुलाआभावी होणारी ग्रामस्थांची परवड राज्यकर्ते व शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. इतकेच नव्हे तर सातत्याने खासदार, आमदार व मंत्री महोदय आणि प्रशासन, राजकीय मंडळी यांच्याकडे २०१६ पासून अविरत पाठपुरावा सुरू ठेवला. अन त्याचे फलित अखेर मार्च २०२० ला त्यांना मिळाले आहे.
जानेवारी २०२० मध्ये पुणे येथे झालेल्या अप्रायजल छाननित हेवाळे पुलाला नाबार्ड मधून तत्वतः मान्यता मिळाली होती. तर २४ मार्च २०२० रोजी अत्यंत महत्त्वाच्या या पुलाला राज्यशासनाने प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. कोविड मुळे तांत्रिक मान्यता व टेंडर प्रोसिजर जरी तूर्तास थांबली असली तरी येत्या वर्षांत या पुलाच्या कामांस प्रत्यक्ष सुरवात व्हायला हरकत नाही. एकूणच हेवाळे गावचे माजी सरपंच संदीप देसाई व ग्रामस्थ यांच्या सांघिक लढ्याला यश आले असून हेवाळे गावचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 17 =