You are currently viewing पोलिस अधिकारी असलेल्या भगिनीच भावासाठी न्यायालयाच्या प्रतिक्षेत

पोलिस अधिकारी असलेल्या भगिनीच भावासाठी न्यायालयाच्या प्रतिक्षेत

नांदेड :

जमिनीचा कब्जा जबरदस्तीने घेऊन निरपराध व्यक्तीला मारहाण करणाऱ्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी पोलिस अधिकारी असलेल्या दोघी बहिणींनाच न्यायालयाची दाद मागावी लागत आहे. असे होत असेल तर सामान्य माणसाची काय अवस्था, असा सवाल सध्या नागरिकांकडून होत असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित योग्य ती कार्यवाही करावी आणि गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

सोमेश मारोतीराव कलेटवाड यांना देगलूर, जिल्हा नांदेड येथील सर्व्हे क्रमांक २१३ (आ) गट क्रमांक ६०५ मध्ये ०.३५ आर जमिनीबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे ९५४३/२०२१ ही याचिका दाखल आहे. असे असतानाही २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७.४० वाजता डीवायएसपी सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक सोहन माछरे आणि उपनिरीक्षक श्रीकांत मोरे यांच्यासह, ३० जणांचा पोलिस फौजफाटा येऊन त्यांनी पोलिस वसाहतीसाठी त्या जागेत मुरुम टाकण्याचे काम सुरु केले. त्यांना मज्जाव करत असताना सोमेश यांना पोलिसांनी जबरदस्त मारहाण केली. अर्वाच्च शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी आपल्या जबानीत म्हटले आहे.

जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च शिवीगाळ आणि जबरदस्त मारहाण यामुळे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध व ४ पोलीस कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल कऱण्यासाठी जंग जंग पछाडले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे धाव घेतली. दोघांनीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. मात्र तरीही पोलिसांविरोधात ७३ दिवस उलटूनही गुन्हा दाखल होत नाही, त्यांची अजूनही चौकशीच होत आहे यामुळे अखेर या प्रकरणा विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा