You are currently viewing महामार्गांचा पर्यावरणपुरक विकास करण्यावर भर देण्यात यावा…

महामार्गांचा पर्यावरणपुरक विकास करण्यावर भर देण्यात यावा…

– पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे

मुंबई

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासह (नागपूर-मुंबई) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील विविध महामार्गांवर वृक्षारोपण करणे, महामार्गांवर सौर उर्जेचा वापर करणे, रेन वॉटर हार्वेस्टींग करणे, इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरास चालना देणे यासह समृद्धी महामार्गाच्या बांधकामामध्ये औष्णिक उर्जा निर्मिती केंद्रांमधील फ्लाय ॲशचा वापर करणे या अनुषंगाने सोमवारी पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. महामार्गांचा पर्यावरणपुरक विकास करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना यावेळी मंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या.

            मंत्रालयात झालेल्या या बैठकीस पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

            मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, भविष्यात पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरास चालना देणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने शासनामार्फत या वाहनांसाठी आतापर्यंत विविध सवलती देण्यात आल्या आहेत. याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या महामार्गांवर इलेक्ट्रीक वाहनांना टोलमध्ये काही सवलत देता येऊ शकेल का याबाबत विचार करावा, असे त्यांनी सांगितले. औष्णिक वीज प्रकल्पातून उत्सर्जित होणाऱ्या राखेचा वापर रस्ते बांधकामात केल्यास मोठ्या प्रमाणात प्रदुषण नियंत्रण करता येईल. तसेच महामार्गाचे बांधकाम करतानाच त्यावर सौर उर्जेचा वापर, रेन वॉटर हार्वेस्टींग तसेच महामार्गाच्या दुतर्फा आणि विभाजक आदी ठिकाणी वृक्षारोपण करणे आदी कामांवर भर देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आदी ठिकाणी प्राधान्याने ही कामे करता येतील, असे ते म्हणाले.

            समृद्धी महामार्गावर पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने वृक्षारोपणासाठी बॉटनिकल इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया यांनी केलेल्या शिफारशीनुसार त्या त्या जिल्ह्यातील वातावरणाला सुलभ अशा वृक्षांची निवड करण्यात आली आहे. शिवाय झाडांचे जीओ टॅगिंग करणे, त्यांचे पाच वर्ष जतन, संवर्धन करण्यासाठी नियोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 2 =