You are currently viewing 16 एप्रिल रोजी देवगडात भव्य मिसळ महोत्सव

16 एप्रिल रोजी देवगडात भव्य मिसळ महोत्सव

देवगड :

 

देवगड शहरात रविवार दि. 16 एप्रिल रोजी देवगड कॉलेज नाका, डॉ. सावंत कंपाउंड येथे आम. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून भव्य मिसळ महोत्सव भरवण्यात येणार असून कोल्हापूर, पुणे सह राज्यभरातील नामांकित मिसळ ची चव देवगडवासीय आणि पर्यटक खवय्यांना चाखता येणार आहे. आम. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून 3 वर्षांपूर्वी वैभववाडीत संपन्न झालेल्या मिसळ महोत्सवाला वैभववाडी तालुकवासीयांसह जिल्ह्याभरातील खवय्यानी उपस्थिती लावत तुफान प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता देवगडवासीयांसाठी आम. नितेश राणे 16 एप्रिल रोजी भव्य मिसळ महोत्सव भरवत आहेत.

16 एप्रिल रोजी दिवसभर चालणाऱ्या या मिसळ महोत्सवात राज्यभरातील नामांकित असे 25 हुन अधिक मिसळ स्टॉल असणार आहेत. त्यासोबतच सिने कलाकारांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही रसिकांना मिळणार आहे. देवगड हे शहर पर्यटनदृष्ट्या राज्यासह देश – विदेशात पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी आम. नितेश राणे मागील काही वर्षे अविरत प्रयत्न करत आहेत. सिंधू फिल्म फेस्टिव्हल, देवगड पवनचक्की येथील सी व्ह्यू असलेले मनोवेधक गार्डन, झिप लाईन, व्हॅक्स म्युझियम, देशातील पहिले कंटेनर थिएटर हे प्रकल्प आम. नितेश राणेंनी देवगड शहरात राबवल्यामुळे साहजिकच पर्यटकांची पावले देवगडकडे वळू लागली आहेत.

सध्या दहावी, बारावी च्या परीक्षा संपल्यामुळे पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. तसेच हापुसचा राजा असलेला देवगड हापूस आंबाही मार्केटमध्ये आला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटक तसेच खवय्यांना चटकदार मिसळ ची मेजवानी या मिसळ महोत्सवातून मिळणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा