You are currently viewing सदैव चर्चेत असणारे राजकीय व्यक्तिमत्त्व..

सदैव चर्चेत असणारे राजकीय व्यक्तिमत्त्व..

संपादकीय….

सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार माजी पालकमंत्री आणि सावंतवाडीचे शिल्पकार दीपक केसरकर आपल्या राजकीय वाटचालीत सदैव चर्चेत राहिलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व…! दिपकभाई जिल्ह्यात असो वा नसो राजकीय आखाड्यातील नेत्यांसाठी ते नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. विरोधक आणि भाई प्रेमी दोघेही ज्यांच्यावर अगदी बिनधास्तपणे टीका करू शकतात ते म्हणजे दीपकभाई. दीपकभाई कधीही विरोधकांच्या टिकेकडे लक्ष देत नाहीत. आपली ध्येय, उद्दिष्ट ठरवून मार्गक्रमण करत असतात, त्यामुळे दुसऱ्यांनी केलेल्या टीकेमुळे ते कधीच विचलित होत नाहीत. भाईंच्या चुकीवर त्यांचे प्रियजन देखील बोलतात, परंतु हसत हसत भाई मात्र त्यांचे बोलणे मनाला न लावून घेता आपल्या व्यक्तींना जपण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे भाईंवर नाराज झालेले त्यांचे समर्थक देखील नाराजी दूर ठेऊन भाईंच्या सोबत कायम असतात.
दीपक केसरकर राजकारणात आल्यापासून आपली राजकीय ध्येय समोर ठेऊन कार्यरत राहिले. जिल्ह्याच्या विकास करण्याच्या दृष्टीने त्यांनी अनेक उपक्रम राबविले होते. पर्यटनाच्या माध्यमातून देखील त्यांनी जिल्ह्याची विकासात्मक घडी बसविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जिल्ह्यातील अधिकारी वर्गाची साथ न लाभल्याने अनेक प्रकल्प ठप्प झाले. आपल्या मंत्रिपदाच्या काळात त्यांनी आजपर्यंतचा सर्वाधिक निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आणला होता. परंतु निधीचा विनियोग योग्यप्रकारे न झाल्याने विकास खुंटला. परंतु त्यांनी आणलेल्या योजना आज त्यांचे मंत्रिपद गेल्यानंतरही मात्र सिंधुदुर्गात कार्यान्वित होताना दिसत आहेत. त्यासाठी ते स्वतः देखील उच्च पातळीवरून प्रयत्नशील राहिले आहेत. कोरोनाच्या काळात मुंबईत राहत सावंतवाडीत होऊ घातलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात मंजूर करून आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
दीपक केसरकर यांनी निस्वार्थीपणे जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केले. सावंतवाडीचे नगराध्यक्ष असताना देखील त्यांनी सावंतवाडीच्या विकासासाठी राज्य पातळीवर प्रयत्न करून पर्यटन निधी सावंतवाडीत आणून शहराचा कायापालट केला होता. त्यांची विकासाच्या दूरदृष्टी आहे, व्हिजन असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी आपल्यापरीने कार्य केले, भले कार्यकर्ते त्यांच्याकडे घडले नसतील. परंतु अनेक विकासात्मक योजना त्यांनी जिल्ह्यात राबविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. जिल्ह्याचे पालकमंत्री बदलून वर्ष होत आले, परंतु आपल्या जिल्ह्यातील नेता पालकमंत्री असताना काम करत नाही म्हणून जी विरोधकांची ओरड असायची ती मात्र आता दिसून येत नाही, त्यामुळे शेजारची होकाल कुरडी असाच प्रकार केसरकर यांच्या बाबतीत होत होता असे दिसून येते. आणि त्याला कारणही होते ते म्हणजे आपला हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा सुद्धा थोड्या जास्तच असायच्या.
कसं आहे, बरं आहे ना? असं आपुलकीने विचारणारे दीपकभाई लॉकडाऊन काळात मुंबईत राहिले तेव्हाही टीकेचे लक्ष बनले होते. परंतु मतदारसंघात राहून काम करणारे वैभव नाईक जेव्हा कोविड चे शिकार बनले तेव्हाही विरोधकांनी टीका केलेलीच. त्यामुळे विरोधक दोन्ही बाजूने पुंगी वाजवणारच हे ते गृहीत धरून असतात. सहा सात महिन्यांनी केसरकर सावंतवाडीत आले तेव्हाही विरोधकांमध्ये त्यांचीच चर्चा होती. त्यांच्या येण्याचीही विरोधक दखल घेतात. भाई इले मरे…..आता इतक्यात जातीत असा दिसना नाय. असेही सूर आळवताना दिसून येतात. त्यामुळे दीपक केसरकर जिल्ह्यात असले आणि नसले तरी विरोधकांमध्ये त्यांची चर्चा ही होतंच राहते. आणि चर्चा त्याच व्यक्तीची होते, जी व्यक्ती काहीतरी करण्यासाठी धडपडत असते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + eighteen =