शारदीय नवरात्रोत्सव….

शारदीय नवरात्रोत्सव….

संपादकीय…..

शारदीय नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत शारदीय नवरात्रात देवीची उपासना केली जाते. शरद ऋतूच्या सुरुवातीस येते म्हणून शारदीय म्हटलं जातं. शारदीय नवरात्रोत्सव शाक्तपंथीय मानला जातो. दुर्गेचा उत्सव भारतात वर्षातून दोन वेळा शरद ऋतूत आणि वसंत ऋतूत साजरा केला जातो. अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव
महाराष्ट्रात तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण पीठे असून वणीची सप्तश्रृंगी हे अर्धपीठ मानले जाते, अशी ही साडेतीन शक्तिपीठे आहेत. नवरात्रीचे नऊ दिवस भीषण युद्ध करत अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी, असे नाव पडले. तिच्याच शक्तीरूपाची पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ, हातात तलवार, खड्ग, आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्ती नवरात्रीत पुजली जाते.
पावसाळा संपून शेतात पिके तयार झालेली असतात अशा नैसर्गिक वातावरणात प्रतिपदेला घटस्थापना होते. देव्हाऱ्यात अखंड नंदादीप, झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशाप्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते. नवरात्र हे काम्य व्रत आहे, काही घराण्यात या व्रताला कुलाचाराचे स्वरूप असते. नऊ दिवस रोज कुमारिकेची पूजा करून तिला भोजन वाढतात. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री अशी देवीची नऊ रूपे आहेत.
नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ असतो, त्यामुळे आपल्यात नवी शक्ती, उत्साह, उमेद तयार होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य व इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ असून ब्रम्हचर्य, संयम, उपासना, यज्ञ, केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ मानला जातो.
जोगवा मागणे हा सुद्धा देवीच्या उपासनेचा एक प्रकार आहे. काही ठिकाणी परडीमध्ये देवी ठेवून पाचघरे फिरून मूठभर तांदूळ अथवा पीठ मागितले जाते याला जोगवा मागणे म्हणतात. अहंकाराचे विसर्जन करणे हा या मागचा हेतू असावा. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमी, आठव्या दिवशी दुर्गाष्टमी व नवव्या दिवसाला महानवमी आणि अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणतात. चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला अशी कथा आहे. दसऱ्याला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे म्हणून नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस म्हणतात.
दसरा हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त समजला जातो. यादिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजा व शस्त्रपूजा ही कृत्ये करायची असतात. विजयाचे प्रतीक म्हणून दसऱ्याला विजयादशमी म्हणतात. रामाने नऊ दिवस देवीची म्हणजे शक्तीची उपासना करून देवीच्या उपासनेने शक्ती निर्माण झाली म्हणून रामाने रावणाचा वध केला. म्हणून या दिवसाला विजयादशमी म्हणतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा