You are currently viewing बांदा-संकेश्वर महामार्ग रेडी पर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करणार – दीपक केसरकर

बांदा-संकेश्वर महामार्ग रेडी पर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करणार – दीपक केसरकर

सावंतवाडी

नियोजित संकेश्वर-बांदा हा महामार्ग आजऱ्यापर्यंत मंजूर झाला आहे. त्याचे काम ही सुरू झाले आहे. त्या पुढे हा रस्ता बांदा येथे जाणार परंतु तो रेडी पर्यत नेण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सावंतवाडीचा रिंग रोड वापरण्यात येणार आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यानी दिली. दरम्यान यापूर्वी कुडाळला शासकीय महाविद्यालय झाले आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी बाल व महिला रुग्णालय आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा दर्जा पुन्हा एकदा सावंतवाडी कुटीर रुग्णालयाला मिळावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यात वादाचा विषय होवू शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
नियोजित संकेश्वर- बांदा हा रस्ता नेमका कुठून जाणार याबाबत आपल्याला वारंवार माहिती विचारून सुद्धा माहिती दिली जात नाही. मंत्री दीपक केसरकर हे लोकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप माजी आमदार शिवराम दळवी यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेत श्री. केसरकर यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, हा महामार्ग संकेश्वर ते बांदा असा प्रस्तावित आहे. बांदयातून महामार्ग जात असल्यामुळे तो रस्ता थेट बांद्यालाच जोडला जाणार आहे. परंतु हा रस्ता रेडी पर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे. त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत. सावंतवाडीतून जाणाऱ्या रिंग रोड वरून हा रस्ता नेण्यात येणार आहे त्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याशी मी चर्चा करणार आहे. सावंतवाडी रुग्णालयाला पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा, अशी मागणी होते आहे. याबाबत श्री. केसरकर यांना विचारले असता कुडाळ येथे याआधीच शासकीय महाविद्यालय तर दुसरीकडे महिला व बाल रुग्णालय सुद्धा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. सावंतवाडीला यापूर्वी जिल्हा रुग्णालय होते. मात्र मध्यंतरीच्या काळातील ओरोस येथे हलविण्यात आले. मात्र पुन्हा एकदा या जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देता येऊ शकतो. ते गरजेचे आहे. त्यामुळे तो वादाचा विषय होऊ शकत नाही. आणि तसा वाद कोणी निर्माण करू नये ,असे त्यांनी सांगितले. भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी केलेल्या टिके बाबत किंवा एकला चलोच्या भूमिकेबाबत श्री. केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, मी या ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या टिकेला उत्तर देणार नाही. याबाबतची भूमिका वरिष्ठ स्तरावर ठरणार आहे. त्यामुळे कोण काय बोलले यावर मी बोलणे योग्य ठरणार नाही. काही गैरसमज असतील तर ते चर्चा करून सोडवण्यात येतील.ज्या उपजिल्हा रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयात औषध पुरवठा नाही त्या ठिकाणी तात्काळ औषध पुरवठा पुरवण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊ ,अन्यथा संबंधित अधिकारी बदलण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. याबाबत चांगल्या सुविधा मिळण्या सोबत वैद्यकीय अधिकारी नेमणूकीसाठी आपण आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा