You are currently viewing १ एप्रिल पासून हत्तीमुक्त तिलारीखोरे समितीचे उपोषण

१ एप्रिल पासून हत्तीमुक्त तिलारीखोरे समितीचे उपोषण

वनक्षेत्रपाल यांना दिले निवेदन;हत्ती पकडण्यासाठी कोणतीही मोहीम राबविली नसल्याने घेतला निर्णय

दोडामार्ग

तिलारी खोऱ्यात मागील २२ वर्षांपासून रानटी हत्ती नुकसान करत आहेत. या हत्तींना पकडण्यासाठी वनविभाग तसेच शासन स्तरावरून कोणतीही मोहीम राबविली गेली नसल्याने १ एप्रिल पासून दोडामाग वनविभाग कार्यालय समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा हत्तीमुक्त तिलारीखोरे समितीचे पदाधिकारी प्रेमानंद देसाई, तेजस देसाई, प्रवीण गवस, सोनाली गवस, साक्षी देसाई, समीर देसाई यांनी निवेदनाद्वारे वनक्षेत्रपाल यांना दिला आहे.

दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, तिलारी खोरे परिसरात वीस वर्षांपूर्वी हत्तींचे आगमन झाले होते. मांगेली, हेवाळे, तेरवण-मेढे, घोटगेवाडी, मोर्ले, केर-भेकुर्ली या ग्रामपंचायत क्षेत्रात उच्छाद मांडला असून गेल्या वीस वर्षात शासन स्तरावरून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये हत्तींच्या मार्गावर लोखंडी खांब उभारणे, खंदक खोदणे, सौर कुंपण उभारणे, मिरची पूड दोरखंड, अग्निबाण, फटाके, ढोल वाजवून हत्तींना रोखणे तसेच हत्ती पकड मोहीम राबविणे अशासारखे अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या. मात्र या सर्व उपाययोजना कुचकामी ठरल्यामुळे या परिसरातील शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली आलेला आहे. गेल्या पन्नास वर्षापासून तयार केलेली वृक्षशेतीवरील बागायती हत्तींमुळे नासधूस होऊन प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
३ मार्च रोजी सर्व हत्तीबाधित गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन तिलारी खोरे हत्तीमुक्त समिती स्थापन केली व पत्रकार परिषद घेऊन वनविभाग तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आज पर्यंत याबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात शासन स्तरावर कोणतेही पाऊल न उचलल्याचे निदर्शनास आलेले आहे. परिणामी येथील शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे १ एप्रिल रोजी येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा हत्तीमुक्त तिलारी खोरे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वनविभागाला दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × five =