You are currently viewing मुंबईचा सलग पाचवा विजय, गुजरातचा 55 धावांनी पराभव

मुंबईचा सलग पाचवा विजय, गुजरातचा 55 धावांनी पराभव

*प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

महिला प्रीमियर लीगच्या १२व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा ५५ धावांनी पराभव केला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ८ गडी गमावून १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात जायंट्स संघ २० षटकांत ९ गडी गमावून १०७ धावाच करू शकला.

मुंबई इंडियन्स संघाचा हा सलग पाचवा विजय ठरला. १० गुणांसह हा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. याशिवाय या स्पर्धेत आतापर्यंत २०० पेक्षा कमी धावसंख्येचा बचाव करणारा मुंबई संघ पहिला संघ ठरला आहे.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ८ गडी गमावून १६२ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३० चेंडूत ५१ धावांची धडाकेबाज खेळी केली. यास्तिका भाटियाने ४४ धावा केल्या. मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही.

सलामीवीर हेली मॅथ्यूजला डावाच्या पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ऍशले गार्डनरने बाद केले. तिला खातेही उघडता आले नाही. यानंतर नॅट सीवर ब्रंट आणि यास्तिका भाटिया यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. नॅट सीवर ब्रंट ३१ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३६ धावा करून बाद झाली.

यास्तिका भाटियाचे अर्धशतक हुकले. तिने ३७ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४४ धावा केल्या. यानंतर हरमनप्रीत कौर आणि अमेलिया कार यांनी चौथ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. अमेलिया १९ धावा करून बाद झाली. त्याचवेळी इसाई वँगला खातेही उघडता आले नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरने झंझावाती अर्धशतक ठोकले, पण अर्धशतकानंतर तिने तिची विकेट गमावली. हरमनप्रीतला गार्डनरने हरलीन देओलच्या हाती झेलबाद केले.

हरमनप्रीतने आपल्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार मारले. हुमैरा काझी (२) आणि अमनजोत कौर (०) यांना फार काही करता आले नाही. धारा गुजरने एक धाव आणि जिंतीमणी कलिताने दोन धावा केल्यानंतर नाबाद राहिले. गुजराततर्फे अॅश्ले गार्डनरने तीन बळी घेतले. तर किम गर्थ, स्नेह राणा आणि तनुजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघाची सुरुवातही खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर सोफिया डंकले बाद झाली. तिला खातेही उघडता आले नाही. एस. मेघना १६ आणि हरलीन देओल २२ धावांवर बाद झाली. अॅनाबेल सदरलँडलाही खाते उघडता आले नाही. अॅश्ले गार्डनर ८, डी. हेमलता ६, कर्णधार स्नेह राणा २०, सुषमा वर्मा १८, किम गर्थ ८ धावा आणि तनुजा कंवर खाते न उघडता बाद झाल्या. मुंबईतर्फे नॅट सीवर ब्रंट आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. अमेलिया कारने दोन गडी बाद केले. त्याचवेळी इसाई वँगला एक विकेट मिळाली.

हरमनप्रीत कौरला झंझावाती अर्धशतकासाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

उद्या युपी विरुद्ध आरसीबी सामना डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता खेळवला जाणार आहे. युपी संघ तिसरं स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल तर आरसीबी संघ पहिल्या विजयासाठी सर्वस्व पणाला लावेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =