You are currently viewing गोलंदाजांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने साजरी केली विजयाची हॅट्ट्रिक**महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्लीचा पहिला पराभव

गोलंदाजांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने साजरी केली विजयाची हॅट्ट्रिक**महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्लीचा पहिला पराभव

*गोलंदाजांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने साजरी केली विजयाची हॅट्ट्रिक**महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्लीचा पहिला पराभव*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

मुंबईचा संघ तीन सामन्यांतून तीन विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यांचे सहा अंक आहेत. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सला स्पर्धेतील तीन सामन्यांत पहिला पराभव स्वीकारावा लागला. तीन सामन्यांतून दोन विजयांसह ते दुसऱ्या स्थानावर आहेत.

महिला प्रीमियर लीगच्या सातव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर आठ गडी राखून विजय मिळवला. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर गुरुवारी (९ मार्च) दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय चुकीचा ठरला. संघ १८ षटकांत १०५ धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात मुंबईने १५ षटकांत २ बाद १०९ धावा करून सामना जिंकला.

मुंबईसाठी या सामन्यात गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. सायका इशाक, इस्सी वाँग आणि हिली मॅथ्यूजने प्रत्येकी तीन बळी घेतले. पूजा वस्त्राकरला एक विकेट मिळाली. यानंतर यस्तिका भाटियाने फलंदाजीत सर्वाधिक ४१ धावा केल्या. हिली मॅथ्यूजने ३२ धावांचे योगदान दिले. नताली सीव्हर २३ आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने ११ धावा करून नाबाद राहिली.

त्याआधी दिल्लीकडून कर्णधार मेग लॅनिंगने सर्वाधिक ४३ धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जने २५ आणि राधा यादवने १० धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. एलिस कॅप्सी सहा आणि तानिया भाटियाने चार धावा केल्या. शफाली वर्मा, मारिजन कॅप आणि जेस जोनासेन यांना प्रत्येकी दोनच धावा करता आल्या. मिन्नू मणी आणि तारा नौरीस यांना खातेही उघडता आले नाही. शिखा पांडेने नाबाद चार धावा केल्या.

सायका इशाकला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. तिने गोलंदाजी करताना केवळ ३ षटकांत ३/१३ अशी कामगिरी केली होती.

उद्या १० मार्च रोजी आरसीबी विरुद्ध युपी सामना होणार आहे. आरसीबी आपला पहिला विजय शोधत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ ११ मार्च रोजी गुजरात जायंट्सशी भिडणार आहे. त्याचवेळी, मुंबईचा पुढील सामना १२ मार्चला यूपी वॉरियर्सशी होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा