You are currently viewing संकेश्वर – बांदा महामार्गाच्या सर्व्हेस आक्षेप

संकेश्वर – बांदा महामार्गाच्या सर्व्हेस आक्षेप

सावंतवाडी 

शासन व अधिकारी यांनी लोकप्रतिनिधी व जनतेला अंधारात ठेवून संकेश्‍वर-बांदा महामार्गाचे बावळाट मार्गे आंबोली पर्यतचे सर्व्हेक्षण पूर्ण केले आहे. जनतेची घोर फसवणूक आहे. सावंतवाडीतून हा मार्ग जावा, यासाठी बैठकीत ठरावही घेतले आहेत. जनतेला अंधारात ठेऊन सर्वेक्षण का केले असा सवाल येथील पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण ऊर्फ बाबू सावंत, रवी मडगावकर यांनी पंचायत समिती बैठकीत उपस्थित उपकार्यकारी अभियंता अनिल आवटी यांना धारेवर धरले.

येथील पंचायत समितीची मासिक सभा नूतन सभापती निकिता सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, नितीन आरोंदेकर, कक्ष अधिकारी दत्ता गायकवाड आदी उपस्थित होते.

बांदा संकेश्‍वर हा नवा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे. हा महामार्ग संकेश्‍वर गडहिंग्लज-आजरा-आंबोली व बावळाट मार्गे बांदा-रेडी सागरी महामार्गापर्यंत जाणार आहे. केंद्राच्या अर्थसंकल्पीय निधीतून या महामार्गासाठी 574 कोटी रुपयेचा निधी मंजूर झाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्रालयाने या नव्या राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी दिली असून याचे संकेश्‍वर ते आंबोलीपर्यतचे 61 किलोमीटरचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. या रस्त्याला महामार्गाचा दर्जा देऊन त्याचे दुपदरीकरण केले जाणार आहे, अशी माहिती मासिक सभेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता आवटी यांनी दिली.

यावेळी सदस्य मडगावकर यांनी हरकत घेत हा महामार्ग बावळाटमधून जाण्यास यापूर्वीच सभागृहाने हरकत घेतली होती. तसा एकमुखी ठरावही घेण्यात आला आहे आणि तसे असून देखील या महामार्गाचे आंबोलीपर्यत दोन वेळा सर्व्हेक्षण होते आणि लोकप्रतिनिधी व जनतेला काहीच माहिती दिली जात नाही, हे योग्य नसल्याचे ते म्हणाले. सदस्य बाबू सावंत यांनी यापूर्वी बायपास शहराबाहेरून गेला, आता राष्ट्रीय महामार्ग पण बाहेरून जाईल, अशामुळे सावंतवाडी शहराचे अस्तित्वच धोक्‍यात येईल. वेळप्रसंगी जनआंदोलन उभारू असा इशारा दिला.
यावेळी अभियंता आवटी यांनी या महामार्गाचे काम पूर्वी नॅशनल हायवे औथोरिटी ऑफ इंडिया कोल्हापूर या विभागाकडे होते. त्यानंतर ते सार्वजनिक बांधकाम विभाग नॅशनल हायवे कोल्हापूर विभागाकडे वर्ग करण्यात आले. या हायवेचा आंबोलीपर्यत सर्व्हे झाला आहे.

सलग दोनवेळा सर्व्हे झाला असून आपण त्यावेळी उपस्थित होतो अशी माहिती दिली. हा महामार्ग बावळाटमधून जाणार असल्याचे देखील त्यांनी मान्य केले. त्यानंतर आम्ही घेतलेल्या ठरावाचे काय असा सवाल करीत आमची नोंद घ्या, असे सदस्यांनी सांगितले. यावेळी तालुक्‍यातील बहुतांशी विकासकामे रखडली असून पावसाळा आला तरी कामे अर्धवट आहेत असा प्रश्‍न सदस्य मडगावकर व सदस्य सावंत यांनी केला; मात्र यावेळी निधीच आला नसल्याची माहिती आवटी यांनी सभागृहात दिली. जो निधी आला तो जुन्या कामांना आला असल्याचे त्यांनी सांगितले. कुडाळ तालुक्‍याला भरघोस निधी येतो आणि सावंतवाडी तालुक्‍याला नाही हा या तालुक्‍यावर अन्याय असून दुजाभाव चालला आहे, असा आरोप सदस्यांनी केला.

आंबोली भागातील रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करून घेण्याचे आदेश देत जे ठेकेदार कामे करण्यास विलंब करत आहेत त्यांना काळ्या यादीत टाका, आशा सूचना सभापती सावंत यांनी केल्या. यावर्षी निधीअभावी बरीचशी विकासकामे रेंगाळली आहेत. त्यामुळे वेळ पडल्यास कार्यकारी अभियंता यांची भेट घेणार असल्याचे सभापती सावंत यांनी सांगितले. जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीकडून सुचवण्यात आलेल्या रस्त्याची कामे कोणीही माहितीच्या अधिकारात तक्रार केल्यानंतर तत्काळ बंद करण्यात येतात. ती बंद करून पूर्ण गावाला वेठीस धरण्यात येऊ नये. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनशी चर्चा करा, अशी सूचना सदस्य मडगावकर यांनी सभेत दिली. त्याला सर्वानुमते अनुमती देण्यात आली.

तळवडेत पाणी टंचाई
सध्या गावामध्ये पाणी टंचाई आहे. तळवडे गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून त्यांचा अद्याप प्रस्ताव आला नाही. ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामस्थांमध्ये एकवाक्‍यता नसल्याची माहिती दिली असल्याचे पाणी पुरवठा अभियंता मठकर यांनी दिली. याप्रश्‍नी ग्रामस्थांची भेट घेऊन तोडगा काढणार असल्याचे सदस्य पंकज पेडणेकर यांनी सांगितले.

वीज बिलप्रश्‍नी सहानुभूती दाखवा
वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांना थोडी सहानुभूती दाखवण्यात यावी. लगेच त्यांचे कनेक्‍शन तोडले जाऊ नये, अशी मागणी सदस्यांनी बैठकीत केली. वर्षभर वीज बिल न भरलेले चार हजार ग्राहक होते. त्यांना टप्पाटप्प्याने वीज बिल भरण्याची मुदत दिली होती तरी ही त्यांनी बिले भरली नाही. त्यामुळे कनेक्‍शन तोडण्यात आली. आता फक्त 126 वीज ग्राहक उरले असून उर्वरित सर्वांनी बिले भरली आहेत. परिणामी कनेक्‍शन तोडली जाणार नाहीत, अशी माहिती वीज अधिकारी व्ही. बी. बागलकर यांनी दिली.

सावंतवाडीत 200 रुग्ण वाढले
सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यांच्यावर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. पूर्वी एकूण 830 रूग्ण होते. त्यामध्ये 200 रुग्णांची आता वाढ झाली आहे. 6 हजार 937 जणांना कोव्हॅक्‍सिन लस तर 3 हजार 940 जणांना कोविड शिल्डची लस देण्यात आल्याचे माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी बैठकीत दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 1 =