You are currently viewing ग्रेस हॅरिसच्या बळावर युपी वॉरियर्सचा ३ गडी राखून विजय

ग्रेस हॅरिसच्या बळावर युपी वॉरियर्सचा ३ गडी राखून विजय

गुजरातचा लागोपाठ दुसर्‍या सामन्यात पराभव

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्रेस हॅरिसच्या (२६ चेंडूत नाबाद ५९) शानदार खेळीच्या बळावर रविवारी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या शेवटच्या षटकात युपी वॉरियर्सने गुजरात जायंट्सवर तीन गडी राखून विजय मिळवला.

यूपी वॉरियर्सला शेवटच्या तीन षटकात ५३ धावा हव्या होत्या आणि हॅरिसने त्यांना एक चेंडू राखून विजयी केले. किम गर्थने गुजरात जायंट्ससाठी पाच बळी मिळवले. परंतु रविवारी रात्री हॅरिसने शो चोरल्यामुळे तिचा प्रयत्न व्यर्थ गेला. तत्पूर्वी, हरलीन देओलच्या ४६ धावांनी गुजरात जायंट्सला ६ बाद १६९ अशी मजल मारली होती. सोफी एक्लेस्टोन आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या होत्या. गुजरात जायंट्स संघाचि कर्णधार स्नेह राणाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरातने सहा गड्यांच्या मोबदल्यात 169 धावा केल्या. हरलीन देओलने 46 आणि गार्डनरने 25 धावा केल्या. दीप्ती आणि सोफीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात यूपीने 20 धावांत तीन विकेट गमावल्या. यानंतर किरण नवगिरे आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतकी भागीदारी करत डाव सांभाळला, पण कीम गर्थने पाच विकेट घेत गुजरातला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. शेवटी ग्रेस हॅरिसने झंझावाती अर्धशतक ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ५ गडी गमावून १६९ धावा केल्या. सलामीवीर एस मेघना २४ आणि सोफिया डंकले १३ धावांवर बाद झाली. सदरलँड (८) आणि सुषमा वर्मा (९) यांनाही विशेष काही करता आले नाही. हरलीन देओलने अॅशले गार्डनरसोबत पाचव्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. गार्डनरला दीप्ती शर्माने बाद केले. तिला १९ चेंडूत २५ धावा करता आल्या.

हरलीन ३२ चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने ४६ धावा करून बाद झाली. तिला ताहिल मॅकग्राच्या हाती अंजली सरवानीने झेलबाद केले. यूपीकडून दीप्ती आणि सोफिया एक्लेस्टोनने प्रत्येकी दोन, तर सरवानीला एक विकेट मिळाली.

१७० धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना यूपीने तीन षटकांत २० धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. किम गर्थने कर्णधार अॅलिसा हिली (७), श्वेता सेहरावत (५) आणि ताहिल मॅकग्रा (०) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर किरण नवगिरे आणि दीप्ती शर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. नवगिरेने अर्धशतक झळकावले. त्याचवेळी दीप्ती ११ धावा करून बाद झाली. किम गर्थने यूपीला आणखी दोन धक्के दिले.

तिने प्रथम नवगिरे आणि नंतर सिमरन शेखला बाद केले. नवगिरे ४३ चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५३ धावा करून बाद झाली, तर सिमरनला खातेही उघडता आले नाही. शेवटच्या पाच षटकात यूपीला ७० धावा करायच्या होत्या. देविका वैद्यही चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. सदरलँडने देविकाला बाद केले. यानंतर ऑस्ट्रेलियाची ग्रेस हॅरिस आणि इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन क्रीझवर होत्या. दोघांनी पुन्हा अप्रतिम फलंदाजी केली.

ग्रेसने संपूर्ण सामना स्वत:च्या जोरावर फिरवला. तिने या डावात सुरुवातीच्या १५ चेंडूत १७ धावा केल्या. सामना यूपीच्या हाताबाहेर गेल्याचे दिसत होते. १६व्या षटकात सात आणि १७व्या षटकात १० धावा निघाल्या. शेवटच्या तीन षटकात यूपीला विजयासाठी ५३ धावांची गरज होती. १८व्या षटकात ग्रेस हॅरिसने तीन चौकार आणि एक्लेस्टोनने एक चौकार लगावला. या सामन्यात पाच विकेट घेणाऱ्या किम गर्थने १८व्या षटकात २० धावा दिल्या.

शेवटच्या दोन षटकात यूपीला विजयासाठी ३३ धावा करायच्या होत्या. ग्रेस हॅरिस आणि एक्लेस्टोन यांनी १९व्या षटकात १४ धावा केल्या. आता शेवटच्या षटकात यूपीला विजयासाठी १९ धावांची गरज होती. सदरलँडच्या गोलंदाजीवर ग्रेस हॅरिसने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. पुढचा चेंडू पंचांनी वाईड ठरवलस. ग्रेस हॅरिसने दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. तिसऱ्या चेंडूवर तिने चौकार मारला. पुढचा चेंडू पंचांनी पुन्हा वाईड ठरवला. हॅरिसने चौथ्या चेंडूवर पुन्हा चौकार मारला आणि पाचव्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकला.

पहिल्या १५ चेंडूत १७ धावा करणाऱ्या हॅरिसने आपल्या डावातील शेवटच्या ११ चेंडूंमध्ये ३८१.१८ च्या स्ट्राईक रेटने ४२ धावा केल्या. तिने २६ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ५९ धावा केल्या. त्याचवेळी, एक्लेस्टोनने १२ चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद २२ धावा केल्या. गुजरातकडून किम गर्थने पाच विकेट घेतल्या. त्याचवेळी सदरलँड आणि मानसी जोशी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

गुजरातचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सनेही त्यांचा पराभव केला होता. आता यूपीचा संघ ७ मार्चला दिल्ली कॅपिटल्सशी आणि ८ मार्चला गुजरात जायंट्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल.

ग्रेस हॅरिसला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 17 =