You are currently viewing भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळणार

भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळणार

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश

हिवाळी अधिवेशनात आ. वैभव नाईक यांनी प्रश्न उपस्थित करत केले होते आंदोलन

कणकवली

शेतकऱ्यांना भात खरेदीवर बोनसची रक्कम मिळावी यासाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये बोनस म्हणून प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम दोन हेक्टर मर्यादेत देण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या माध्यमातून भात खरेदी केंद्रे निश्चित करून शेतकऱ्यांकडून उच्चांकी भात खरेदी करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या भाताला दर वाढवून देण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या भाताला १९४० रु वाढीव दर देण्यात आला होता तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना बोनस म्हणून ७०० रु रक्कम देखील देण्यात आली. यावर्षी मात्र शेतकऱ्यांना निश्चित केलेल्या दरानुसार केवळ भात खरेदीची किंमत देण्यात आली होती.भात खरेदीवर बोनसची रक्कम देण्यात आली नव्हती. बोनस रक्कम मिळण्यासाठी आ. वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा केला. त्यावेळी तत्कालीन वित्त मंत्री अजित पवार यांनी बोनस रक्कमेचा मूळ शेतकऱ्यांना लाभ मिळत नसून काही दलालांनाच त्याचा लाभ मिळत असल्याने क्विंटल मागे बोनस रक्कम देण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी हेक्टरी प्रोत्साहन रक्कम देण्याचे जाहीर केले होते. मात्र सरकार बदलल्याने पुन्हा हा प्रश्न प्रलंबित राहिला होता.
मात्र आमदार वैभव नाईक यांनी पुन्हा हिवाळी अधिवेशनात भात खरेदीवर बोनसचा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांची व्यथा राज्य सरकारकडे मांडली होती. तसेच अधिवेशन कालावधीत मुंबईत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन देखील केले होते. अखेर आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश आले असून नोंदणीकृत शेतकऱ्यांना भात लागवडीखालील जमिनीनुसार प्रति हेक्टरी १५ हजार रुपये या प्रमाणे प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम दोन हेक्टर मर्यादेत देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा