You are currently viewing रंग मातीचा….!
  • Post category:कथा
  • Post comments:0 Comments

रंग मातीचा….!

*”मेघनुश्री” या टोपण नावाने लिहिणाऱ्या लेखिका तथा ग्रामीण पत्रकार सौ.मेघा कुलकर्णी लिखित अप्रतिम कोकण दर्शन प्रवास वर्णन*

*रंग मातीचा….!*

प्रत्येकाला आपापल्या गावच्या मातीचा गंध सुखावह वाटतो, जणू मनाच्या कप्प्यातला असतो. नैसर्गिक देणगी म्हणजे ही माती, मग तिचा रंग काळा असू दे किंवा लाल, बालपण त्यांत गुंफलेले असते. उमलणाऱ्या आयुष्याचे पहिले धडे इथे मिळालेले असतात. प्रगती करताना, व्यावहारिक जगांत वावरताना मनुष्य कधीच या मातीपासून लांब जात नाही. प्रवास करून आलेवरही गांवच्या मातीचे दर्शन होताच क्षणांत थकवा निघून जातो, श्वास भरभरून तिचा गंध घ्यावासा वाटतो. नोकरीनिमित्त बाहेर रहाणारी माणसे तर या मातीच्या अधिकाधिक जवळची वाटतात, भाषेविषयी हेच पहायला मिळते. पहिली वीस-बावीस वर्षे कुटुंबांत, गावांत, शहरांत जी बोलीभाषा असते ती सुद्धा या मातीची ओळख असते. समूहांतील एखादा कोणत्या भागांतून आला आहे याची माहिती त्याच्या भाषेवरून निश्चितच होते, आणि ती व्यक्ती मात्र गांवच्या मृद्गंधात हरवून जाते. असा आहे हा मातीचा महिमा.
दिवाळी झाली की अनेकजण सहलीसाठी बाहेर पडतात, सदैव वरदान ठरलेली काळी माती पहात होतेच. यापूर्वीही दोन-तीनदा लाल मातीचे दर्शन झाले होते, स्पर्शही अनुभवला होता म्हणून त्याच ओढीने पुनश्च कोकण दौऱ्याचे नियोजन केले. पहाटे पहाटे प्रवासांस सुरवात झाली. सकाळी सव्वा सहा वाजता सुटलेली बस राधानगरीस थांबली, सुखद गारवा असे म्हणता येईल कारण अजून खूप थंडी पडली नव्हती, त्यांत गरमागरम चहा-नाष्ट्याची सोय दिसून आली. चढणारे – उतरणारे प्रवासी, विद्यार्थी – शिक्षकवर्ग, काही मिनिटे अंतरावर सतत होणाऱ्या बसच्या दरवाज्याचा आवाज तर सर्वपरिचित आहे, त्याबद्दल वेगळे असे काही सांगावे लागत नाही, पण लेखनातून ते समोर यावे असे वाटत रहाते, कारण आजकालच्या नागरी वातावरणात राहणाऱ्या बच्चेकंपनीस त्यांची स्कूल बस सोडल्यास एस.टी./स्टँड या जागा कमी परिचयाच्या असतात. पण याच एस.टी.त दोन माणसे एकाच गांवची भेटली तर परदेशांत देशवासीय भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. शालेय वातावरणातील चर्चांना उधाण आलेले असते.
राधानगरीहून पुढे प्रवास सुरू होताच निसर्गरम्य परिसर, अभयारण्याचे दर्शन असे सगळे अनुभवत असताना काही वेळानंतर फोंडाघाट लागला. घनदाट जंगल, झाडी, प्रचंड वळणावळणाचे रस्ते यांचा आनंद स्वानुभवातूनच मिळू शकतो. प्रवासांत छोटी छोटी गांवे पहायला मिळत असतात. घाटामध्ये अनेकदा टोकाची वळणे असतानाही चालकाचे कौशल्य जाणवत रहाते. फोंडा घाट उतरल्यानंतरही मालवणास पोहोचण्यास दोन तास लागणार आहेत ही माहिती झाली. प्रवास तर चालूच होता, सिंधुदुर्ग पहायची उत्सुकता शिगेला पोहोचली. या सगळ्या विचारांत असताना ‘कट्टा’ ही बाजारपेठ आली, चौके मग दुपारी साडेबारा वाजता मालवण बस स्थानकांत पोहोचलो. लेखिका आणि पत्रकार आहे हे समजताच वाहक आणि चालक सहज संवाद साधतात.
सहलीतील नियोजित रहाण्याची व्यवस्था एस.टी.स्टँडपासून दीड किलोमीटर अंतरावर. तिथे जाताच असे लक्षांत आले की अक्षरशः दोन मिनिटाच्या अंतरावर समुद्र आहे. मग काय मनांतही लाटांचे उधाण निर्माण झाले. जवळच असलेल्या हॉटेलमध्ये भोजनाचा आस्वाद, थोडा वेळ विश्रांती घेऊन दुपारी तीन-साडेतीन च्या दरम्यान जेठी-बंदर ला पोहोचलो. दुपारची वेळ असूनही पर्यटकांची गर्दी दिसून आली, तिकीट काढून बोटीत बसणाऱ्या लोकांना तेथील लोक मदतीचा हात देत होते, जलदुर्ग पहाताना आणि येता-जाताना “जय भवानी जय शिवाजी” या घोषणेने परिसर दुमदुमुन जातो. संध्याकाळी पाच,साडेपाच,सहा नंतर ही बोटव्यवस्था थांबवली जाते, म्हणून दिवसभर पर्यटकांचा ओघ पहायला मिळतो.


परतल्यावर पहिल्या दिवसाची संध्याकाळ चिवला बीच येथे जायचे ठरले. इथे एक बरे वाटले की, एक-दीड किलोमीटर अंतरासाठी रिक्षाभाडे पन्नास रुपये ठरलेले आहे, त्यामुळे मीटर टाकणे आणि म्हणेल तसे भाडे वसूल करणे हे कुठेच दिसले नाही. प्रत्येक घराच्या अंगणांत असलेली तुळस वातावरणातील पावित्र्य जपत रहाते. कौलारू घरे, छोटा बागबगीचा रहिवाशी गांवभागांतही शांतता हेच सगळीकडे पहायला मिळते. बीच वरून परत येत असताना वाटेत गणपतीमंदीर लागले. दूरवर या आरतीचा घंटानाद व स्वर ऐकू येत होते. आपोआप पावले तिकडेच वळली. स्वप्नवत भारलेले हे सर्व अनुभवताना जीवनानंदाकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलतो. पर्यटकांची चौकशी अगदी लहान मुलेही करतात हे पाहून अचंबित व्हायला होते. काही माहिती विचारताच वयोवृद्ध माणसेही मोजक्या शब्दांत न बोलता रस्त्यांचे मार्गदर्शन करतात. सहलीचा दुसरा दिवस मालवणच्या जवळ ‘कट्टा’ या बाजारपेठच्या गांवी जायचे होते. ‘वराडकर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज’ असे संस्थेचे नांव. शतकपूर्तीकडे वाटचाल वर्ष २०२६ अशी माहिती तिथे जाताच समजली. कोल्हापूर येथे गुरुवर्य प्रा. शरद वराडकर यांचे लाभलेले महाविद्यालयातील मार्गदर्शन आणि आज प्रत्यक्ष ही संस्था पहायला मिळणार याचा आनंद वेगळाच होता.
मालवण जवळच असल्याने सकाळी सकाळीच संस्थेत पोहोचलो, सर्वांच्या आदरातिथ्याने, स्वागताने भारावून गेलो. संस्थेच्या सचिव, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक यांची भेट झाली. आज नोकरीची संधी मिळताच तरुणवर्ग शहराकडे धाव घेताना दिसतो. पण वराडकर कुटुंबियांकडून हे ज्ञानदानाचे कार्य कट्टा-मालवण येथे अव्याहतपणे सुरू आहे. त्यादिवशी या संथेचे मूळ संस्थापक डॉ.काकासाहेब वराडकर यांचे प्रतिमा पूजन करायला मिळाले. तो क्षण अहोभाग्याचा वाटला, सुट्टीचे दिवस असूनही मोठ्या इयत्तेतील मुले-मुली जादा क्लास साठी आलेली होती. त्यांच्याशीही थोडा वेळ संवाद साधता आला. तेथून धामापूर पहायला जाणार असे समजताच संस्थेत कार्यरत असणाऱ्या प्राध्यापक मित्रांनी तिकडे सोडायची तयारी दाखवली. अशारितीने या संस्थेचे प्राचार्य प्रा. शरद वराडकर यांच्या आत्मचरित्राच्या मुखपृष्ठावरील ‘अबधारणा’ ही टेकडी धामापूरच्या वाटेवर प्रत्यक्षच पहायला मिळाली.


धामापूरला पोहोचताच भगवती देवीचे मंदीर, धामापूर तलाव, घनदाट जंगल, थोडे चालत राहिल्यावर अनुभवायला मिळणारी निरव शांतता सगळेच अद्भुतरम्य. ही पाणीव्यवस्था मालवणपर्यंत पोहोचली आहे. माहिती घेत घेत हे सर्व पहाताना दुपार झालीच. तिथून मालवणलाच परतायचे होते. निसर्गाचे सान्निध्य, खळाळणारे ओहोळ, झाडामाडांवर चढलेल्या वेली, पक्ष्याप्राण्यांचे आवाज, चालताना फक्त आपल्याच पावलांचा ऐकू येणारा आवाज यांतून मनांस आनंद मिळत रहातोच. त्या दिवशीची संध्याकाळ रॉक गार्डन तिथेच मालवण सेल्फी पॉईंट आहे, बीचवर घालवू असे ठरले. सूर्यास्त पाहणेसाठी गर्दी वाढतच होती. अत्यंत नयनरम्य दृश्ये कॅमेऱ्यात टिपता आली. पण त्याचवेळी हेही लक्षांत येते. डोळ्यांना जी रूपे सूर्यास्ताची दिसत आहेत ती कॅमेऱ्यात पकडताना वेगळी दिसत आहेत, त्यातही डोळे, मन, यांची धावपळ होत आहे. मग नुसते बसून क्षणक्षण अनुभवणे हेच खरे. यानंतर रॉक गार्डन म्युझिकल फाऊंटन पहायला मिळाले. वेगवेगळ्या गीतांवर उडणारे पाण्याचे रंगीत कारंजे पहाताच बालवर्ग खुश झाला. परतीच्या वाटेवर ‘कालनिर्णय’ कार साळगांवकरयांच्या सोन्याच्या गणपतीचे दर्शन व आरती मिळाले. या मंदिरांत मध्यभागी एक अशी जागा आहे, जिथे तुम्ही एक, दोन मिनिटे ध्यानस्थ बसू शकता.


अनेक वेळा असे होते की दूरवरच्या शहरांतील संपर्क ठेवून असतो, पण प्रत्यक्ष भेट मात्र झालेली नसते. अशीच एक भेट घ्यायचे ठरवले, सावंतवाडी येथील प्रकाशक दीपक पटेकर यांची. ज्यांनी माझे लेखन आजवर सहा वेळां ‘संवादमीडिया’ या माध्यमांतून प्रसिध्द केले आहे. पुन्हा सकाळचा प्रवास नागमोडी रस्ते, गर्द हिरवाई, चौकशी करता हे समजले कुणकेश्वर-सावंतवाडी ही सकाळी ९ वाजताची थेट भेट असते. साधारण अकराच्या दरम्यान पोहोचून नियोजित भेट पटेकर यांच्या निवासस्थानीच झाली. तेथेच घरगुती आदरातिथ्य आणि चहा, फराळ झालेवर मोती तलाव, सावंतवाडी पॅलेस, लाकडी खेळण्यासाठी प्रसिध्द असलेली बाजारपेठ पहाता पहाता दुपार झाली. मोती तलावाच्या ब्रिजवर काही काव्यशिल्पे पहायला मिळाली, केशवसुतांच्या तुतारी या कवितेसहित. दुपारचे जेवण होताच पुनश्च मालवणला परतीचा प्रवास.
तिसऱ्या दिवशीच्या प्रवासानंतर विश्रांती घेत असताना सूर्यास्ताची वेळ निघून गेली, पण त्याच दिवशी समुद्राचे रात्रीचे रूप मात्र पहायला मिळाले, खळाळणाऱ्या लाटांनी चंदेरी रंग धारण केला होता. निवासस्थान परतीच्या वाटेवर निरव शांतता आणि नुकतीच होऊन गेलेली दिवाळी त्यामुळे कार्तिक महिन्यातील घराघरां समोरील अंगणातला दीपोत्सव या वातावरणात चैतन्य निर्माण करत होता. या वाटांवरची पदभ्रमंती दमछाक करणारी मुळीच नव्हती. हे सगळे मनसोक्त अनुभवल्यावर विशेषत: शांतता जी मोठ्या शहरांत शोधूनही सापडत नाही, इथेही वाहनांची वर्दळ होती तरीही गोंगाट नव्हता ध्वनीप्रदूषण टाळत नागमोडी वळणावर एकमेकांना वाट करून देण्याची प्रवृती दिसून आली. वातावरणातील समृद्धी मनांत उतरत असावी असे एकूण लक्षांत आले. नंतरचा एक दिवस पूर्ण विश्रांतीसाठी ठेवला दोन चार दिवस सतत फिरल्याने ते आवश्यकच ठरले.


त्या एका विश्रांती दिवशी मालवण बाजारपेठेतून फेरफटका मारत कोकणी मेवा गोळा केला. जेवणानंतर थोडा वेळ गेल्यावर तारकर्ली बीचवर जायचे ठरले. स्थानकावर पोहोचल्यावर समजले की बस किंवा इतर सेवा ही सकाळच्या वेळेत असते, दुपारनंतर रिक्षाशिवाय पर्याय नसतो. पुनश्च रिक्षाप्रवास दोन्ही बाजूस असलेल्या दाट हिरवाईतून “पर्यटक तर आहेत यांना इथले रस्ते काय माहीत असणार?” असा विचार हे लोक कधीही करत नसावेत. त्यामुळे एक वेगळीच आत्मियता दिसते, हेही तितकेच खरे. तारकर्ली बीचवरही भरपूर गर्दी होती. या सगळ्या सहलीमध्ये असे जाणवले की, कोकम सरबत, सोलकढी, चे वेळोवेळी केलेले सेवन लाभदायक ठरले आहे. इतके फिरताना पित्त वगैरेचा त्रास झाला नाही. सूर्यास्ताची वेळ जवळ येत असतानाच बीचवर आसपासच्या भागांत पोलिसांची वर्दळ वाढली, सुरक्षितता वाढवत आहेत हेही लक्षांत आले. कारण शोधायचा प्रयत्न करत असतानाच महाराष्ट्र राज्य नियोजन आयोग – अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे येताना दिसले. “सावंतवाडीत उद्या मिटिंग आहे” अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली, लेखिका म्हणून कोल्हापूरमध्ये अनेक कार्यक्रमांना उपस्थित रहात पण आज पत्रकार म्हणून त्यांच्याशी ओळख झाली, फोटोही घेता आला.
या सगळ्या प्रवासांत वेगळे व्यक्तिमत्व म्हणून वावरता आले चार दिवस मालवणचे पण त्यांतही जनसंपर्क वाढला. तारकर्ली बीचवरून परतताना रिक्षावालेही मालवण आणि येथील लोकांबद्दल भरभरून बोलताना आढळले. होम-स्टे ला पोहोचताच परतीच्या प्रवासाची तयारी सुरू झाली. राजापूरच्या धूतपापेश्वराचे उद्या दर्शन घ्यायचे होते. सकाळी सात वाजता सर्व आवरून मालवणातून निघायचे होते. या सहलीत अगोदर दोन दिवसांपूर्वी समुद्राचे सकाळचे एक वेगळेच रूप अनुभवले होते. निघण्याच्या दिवशीही सकाळच्या चहासोबत एक फेरी समुद्रबीचवर झाली. पाऊल निघत नाही येथून याची प्रचिती आली. मुंबई गाडीने राजापूर पर्यंतचा प्रवास, स्थानकावर सामान ठेवण्यासाठी सहकार्य अर्थात लेखिका आणि पत्रकार म्हणून ओळखपत्र पाहून. प्रथमच हे गांव पहात होते, रस्त्यांच्या चढउताराचा पत्ताच लागत नाही. क्षणांत वळणारे रस्ते, प्रचंड निसर्गसौंदर्य आणि त्याच शांतातेत वास्तव्य करणाऱ्या धूतपापेश्वराचे दर्शन होताच त्याच आवारांत दत्तमंदिरही आहे. सकाळच्या यथासांग पूजेनंतरचे धूपदीपाने हे मंदिर गाभारे मनांतील प्रसन्नता वृद्धींगत करतात. घरांतही दत्तसांप्रदायाचे धार्मिक वातावरण आणि पिढ्यानपिढ्या वाचलेली ‘गुरूचरित्र पोथी’ हे सर्व सुंदर योग जुळून आले होते.
दुपारचे भोजन राजापूरांत घेऊन लांजा-रत्नागिरी यांच्यामध्ये असणाऱ्या ‘अंजणारी’ या गावांस [मामेसासर] जायचे होते. तशीच रत्नागिरी बस राजापूर बसस्थानकावरून मिळाली. थोड्याच वेळांत गांवी पोहोचलो, आधी कळवले असल्याने नातेवाईक वाट पहात होतेच. मन हरखून जावे असे येथीलही वातावरण सुशिक्षित, साहित्याची आवड असणारे लोक, आपुलकीविषयी बोलावे, लिहावे तितके कमीच. नोकरीनिमित्त परप्रांतात रहात तर असतोच त्यांत मध्ये वर्ष २०२०-२०२१ कुणीच कुठे जाऊ न शकल्याने या भेटीचा आनंद निराळाच होता. संध्याकाळी घरच्या गणपतीमंदिरांत देवापुढे सायंदीप लावताना याच्या प्रथमदर्शनानंतर झालेली शैक्षणिक प्रगती आठवली. मोठ्या शहरांतील दोन चार इमारती मावतील असा एकेका घराभोवतीचा परिसर, दुपारपासून अखंड चालू असलेल्या गप्पांमध्ये वेळ कसा निघून गेला ते समजलेच नाही. दुसऱ्या दिवशी रत्नागिरीस जाणे झाले बालदिनाचे औचित्य साधून कुटुंबातील बालकलाकाराची मुलाखत घेता आली.
परतीच्या प्रवासाची बस आंबाघाट चढत होती, पण आठवत होते ते सकाळी सकाळी मालवणांत मिळणारे नाष्ट्याचे घावन, त्याचबरोबर छोट्या मुलांचे घरगुती व्यवसायांत असलेले लक्ष, त्यांचा चुणचुणीतपणा, पर्यटकांची ते करत असलेली विचारपूस, सामान घेऊन क्षणभर उभे असताना “काही मदत हवी आहे का?” अशी विचारणा करत वयोवृद्ध व्यक्तीही रस्त्यांची माहिती देत असतात. हे सर्व पाहिले, अनुभवले की, “यांवा कोकण आपलेच असां” याची सत्यता पटते. असा हा चार-पाच दिवसांच्या सहलीचा, मनांवर आपसुक अधिराज्य करणारा, सुखद अनुभव माझ्या महाराष्ट्राच्या मातीला महावंदनीय प्रणाम करत शब्दबद्ध करता आला.

मेघनुश्री, कोल्हापूर
लेखिका आणि ग्रामीण पत्रकार
भ्रमणध्वनी : ७३८७७८७५१२
ईमेल : megha.kolatkar21@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा