You are currently viewing भय ईथले संपत नाही….

भय ईथले संपत नाही….

मग ईश्वरा तुझी आठवण होते, एकच करा, माणसाने निर्माण केलेली माणुसकी जपा

आयुष्यात आपल्याला काय कमवायचंय हे कळलं पाहिजे! एकाच घरातील सहा-सहा लोक कोरोनाने गेले… माणसाची किंमत कळायला एवढे लोक जाणं गरजेचं होतं का?
एकेकाळी चक्रवर्ती समजल्या जाणाऱ्या राजांची आज समाधी कुठे सापडत नाही आणि सापडलीच तर त्यावर फुल व्हायला माणूस सापडत नाही! कालचक्र खूप मोठं आहे, एक जिवंत व्यक्ती म्हणून आपली किंमत त्यापुढे एखाद्या धुलीकणापेक्षाही खूप छोटी आहे. कोरोनाने दाखवून दिलं की, कोणीही सहज मरू शकतो! श्रीमंत, गरीब, वृद्ध, तरुण, पुरूष, स्त्री, वयस्क, मूल, आई, वडील, भाऊ बहीण… जिवंत असलेला प्रत्येकजण अवेळी मरू शकतो हा संदेश या आजाराने दिला!
या आजाराची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर आहे, या लाटेची दाहकता आपण पाहिली आहे.‌ प्रत्येकाच्या जवळची किमान एक व्यक्ती या लाटेत गेली. पुढील तिसरी, चौथी आणि अशा अनेक लाटा याबद्दल अजूनही अनभिज्ञता आणि भीती आहेच, तरीही आपण ‘मीच मोठा’ या तोऱ्यात असू तर कुठेतरी चुकतोय. शंभर एकर जमीनीचा मालक दहा वीस मढ्यांसोबत एकाच सरणावर जळून गेला, शेकडोंच्या गोतावळ्यात जिचं तोंड दिसत नव्हतं ती माऊली वारस नसल्यासारखी गेली एकाकी गेली. ज्याच्या हाकेवर गाव‌ गोळा व्हायचा तो ॲम्ब्युलन्समध्ये एका कोपऱ्यात फक्त श्र्वास मिळावा म्हणून तडफडून मेला. असं बोललं जायचं की, याच्या सात पिढ्या बसून खातील तो मात्र पुर्वज आणि वंशज नसल्यासारखा एकटाच गेला!
जर हे लोक एखाद्या दुर्धर आजाराने किंवा अपघाताने गेले असते तर विषय वेगळा असता, मनाने स्वीकार केला असता पण आठ दिवसांपूर्वी काहीही त्रास नसलेला, चालता-बोलता माणूस गेला ही भावनाच मनाला सहन होत नाही. बरं जी व्यक्ती गेली ती सहजासहजी नाही तर, ज्या गोष्टीची चहूबाजूला मुबलकता आहे अगदी आपल्या शरीराच्या आजूबाजूला प्रचंड प्रमाणात आहे पण घेऊ शकत नाही त्या ऑक्सिजन अभावी गेली हे किती दु:खद आहे!
मी बघितलंय या सर्वांना शेवटचा श्वास घेताना, शेवटचा आचका घेताना या सर्व लोकांच्या मनात काय विचार आला असेल? आपली संपत्ती? नातेसंबंध? घर? जमीन? शरीर, कमाई, भविष्य, स्वप्नं… नाव, जात, धर्म? काय आठवलं असेल सर्वात शेवटी? ‘फक्त एक… एकच संधी मिळावी, मी माणूस म्हणून जगेल!’ असंच वाटलं असेल ना शेवटचा दीर्घ श्वास घेताना?
हे सर्व लिहीताना मी आणि हे वाचताना तुम्ही जिवंत आहात, आपल्याला अजून एक संधी मिळाली आहे मग आपण माणूस म्हणून जगत आहोत का? निसर्ग अधूनमधून माणसाला माणूसपण शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. या महाप्रलयातून आपण वाचलो आहोत आतातरी माणुसपण शिकायला काय हरकत आहे की अजून एखाद्या संकटाची वाट बघायचीय?
प्राधान्य कशाला द्यायचं हे ठरवता आलं पाहिजे. या काळात वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकाचं प्राधान्य माणूस वाचवणं हे होतं आणि राहिल, कदाचित ते आमचं प्रोफेशन आहे म्हणून असेल. ज्यांना माणूस वाचवता येत नाही त्यांना माणूसकी जपता तर नक्कीच येईल! एकदा का ही जाणीव झाली की मग आयुष्यात काय कमवायचं हा प्रश्र्न शिल्लक राहात नाही आणि शेवटचा दीर्घ श्वास घेताना दुसऱ्या संधीची आस लागून राहात नाही…
संग्रह##अजित

प्रतिक्रिया व्यक्त करा