You are currently viewing वेंगुर्ल्यात उद्या शिक्षकांचे १७ वे राज्य महाअधिवेशन – उदय शिंदे

वेंगुर्ल्यात उद्या शिक्षकांचे १७ वे राज्य महाअधिवेशन – उदय शिंदे

मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती, एक लाख शिक्षक येणार…

वेंगुर्ले

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १७ वे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन उद्या वेंगुर्ले येथे होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्घाटक असून अन्य नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातून अंदाजे एक लाख शिक्षक या अधिवेशनासाठी उपस्थित राहतील, अशी माहिती समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान जिल्ह्यात होत असलेल्या या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सर्व शाळांना उद्या विशेष सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. वेंगुर्ले येथील मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते.

यावेळी राज्य सरचिटणीस विजय कोंबे, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे होय तसेच नामदेव जांभवडेकर, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सिताराम लांबर, भाऊ आजगावकर, संतोष परब, वासुदेव कोळंबकर, संतोष बोडके, प्रसाद जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. शिंदे पुढे म्हणाले,अधिवेशनाचे सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत तसेच खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, वैभव नाईक, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच शिक्षक नेते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाची जोरदार तयारी वेंगुर्ले येथे सुरू आहे. या अधिवेशनातच पुढील तीन वर्षासाठी राज्य कार्यकारणी निवडली जाणार आहे. आमची संघटना गेली ६१ वर्षे शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी चळवळ म्हणून कार्य करत आहे. या महाअधिवेशनातही शिक्षकांच्या विविध मागण्या यामध्ये शिक्षकांची रिक्त पदे, नवीन शिक्षक भरती, वस्ती शाळांचा प्रश्न, घर भाडे आदींवर चर्चा करून शिक्षकांच्या अतिरिक्त कामाकडे शासनाने लक्ष पुरवून शिक्षणातील गुणवत्ता वाढण्यासाठी शिक्षकांना सहकार्य करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही बदलत्या शिक्षण प्रणालीचा फायदा व्हावा यासाठी सर्व सोयी शासनाने उपलब्ध करावेत यास सर्वच मागण्यांबाबत या अधिवेशनात साधक बाधक चर्चा होईल, असे शिंदे यांनी सांगितले. हे अधिवेशन वेंगुर्ले येथे घेत असताना वेंगुर्ले नगरपरिषद, तहसील कार्यालय, पोलीस विभाग व जिल्हा प्रशासन यांचे चांगले सहकार्य लाभत आहे. या अधिवेशनातून जाताना शिक्षकांना नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वासही श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ची सिंधुदुर्ग जिल्हा शाखा उत्कृष्ट व पारदर्शक काम करत आहे. दरवर्षी लेखापरीक्षणासह विविध उपक्रम ही शाखा घेत आहे. त्यामुळे या शाखेचे विशेष कौतुक राज्याध्यक्ष शिंदे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा