You are currently viewing कोलकाताचा बंगळुरूवर त्यांच्या घरच्या मैदानावर सलग पाचवा विजय

कोलकाताचा बंगळुरूवर त्यांच्या घरच्या मैदानावर सलग पाचवा विजय

*कोलकाताचा बंगळुरूवर त्यांच्या घरच्या मैदानावर सलग पाचवा विजय*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आयपीएल २०२३ च्या ३६ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा २१ धावांनी पराभव केला. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने २० षटकात ५ गडी गमावून २०० धावा केल्या. जेसन रॉयने २९ चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार नितीश राणाने २१ चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ४८ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ २० षटकांत आठ गडी गमावून १७९ धावाच करू शकला. कर्णधार विराट कोहलीने ३७ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने ५४ धावांची खेळी केली.

कोलकाता संघाने सलग चार सामने गमावल्यानंतर पहिला सामना जिंकला. त्याच वेळी, बंगळुरू संघ सलग दोन विजयानंतर पराभूत झाला. केकेआरचे आठ सामन्यांत तीन विजय आणि पाच पराभव आहेत. सहा गुणांसह संघ गुणतक्त्यात सातव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर बंगळुरूचा संघ आठ सामन्यांत चार विजय आणि चार पराभवांसह गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर आहे.

कोलकाता संघाने या मोसमात बंगळुरूविरुद्धचे दोन्ही सामने जिंकले आहेत. तत्पूर्वी, केकेआरने ईडन गार्डन्सवर आरसीबीचा ८१ धावांनी पराभव केला. त्यावेळी केकेआरने प्रथम फलंदाजी करताना २०४ धावा केल्या आणि बंगळुरूला १२३ धावांत गुंडाळले. त्या सामन्यात कोलकात्याच्या फिरकीपटूंनी बंगळुरूच्या नऊ विकेट्स घेतल्या होत्या. आजच्या या सामन्यातही केकेआरच्या फिरकीपटूंनी आरसीबीच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळू दिले नाही. सुयशने दोन आणि वरुणने तीन गडी बाद केले.

बेंगळुरू आणि कोलकाता संघ आतापर्यंत ३२ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये कोलकाताचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. केकेआरने १८ सामने जिंकले आहेत, तर बेंगळुरूने १४ सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, दोन्ही संघ बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर १२ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी कोलकाताने आठ आणि बेंगळुरूने चार विजय मिळवले आहेत. या दोघांमधील गेल्या सहा सामन्यांमध्ये केकेआरने चार आणि बेंगळुरूने दोन जिंकले आहेत.

प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने २० षटकांत ५ गडी गमावून २०० धावा केल्या. जेसन रॉय आणि नारायण जगदीशन यांनी पहिल्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. जेसनने या मोसमातील सलग दुसरे अर्धशतक २२ चेंडूत पूर्ण केले. त्याचे हे आयपीएलमधील एकूण चौथे अर्धशतक होते. विजयकुमार वैशाकने १०व्या षटकात जगदीशन आणि जेसन या दोघांनाही बाद केले. वैशाखने प्रथम जगदीशनला डेव्हिड विलीकरवी झेलबाद केले. त्याला २९ चेंडूत २७ धावा करता आल्या. यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जेसन रॉय त्रिफळाचीत झाला. जेसनला २९ चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ५६ धावा करता आल्या. यानंतर कर्णधार नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. सिराज आणि हर्षलने नितीशचे दोन झेल सोडले आणि दोघांना जीवदान दिले. यामुळे कर्णधाराने २१ चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ४८ धावांची खेळी केली. वनिंदू हसरंगाने १८व्या षटकात नितीश आणि व्यंकटेश या दोघांना तंबूमध्ये पाठवले. प्रथम त्याने नितीशला वैशाखकरवी झेलबाद केले. यानंतर व्यंकटेशला मॅक्सवेलकरवी झेलबाद केले. व्यंकटेशला २६ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने ३१ धावा करता आल्या. आंद्रे रसेल पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि एक धाव काढून सिराजच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. रिंकू सिंगने १० चेंडूत १८ आणि डेव्हिड वेसने तीन चेंडूत १२ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. बंगळुरूकडून वनिंदू हसरंगा आणि वैशाकने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी सिराजला एक विकेट मिळाली. शेवटच्या पाच षटकांत कोलकाताने तीन गडी गमावून ६९ धावा केल्या. केकेआरने शेवटच्या षटकात १५ धावा जोडल्या.

२०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरू संघाने प्रभावशाली खेळाडू फाफ डुप्लेसिस आणि कर्णधार विराट कोहली यांच्या जोरावर दमदार सुरुवात केली. दोघांनी दोन षटकात ३० धावा जोडल्या होत्या. यानंतर तिसऱ्या षटकात लेगस्पिनर सुयश शर्मा गोलंदाजीला आला आणि त्याने डुप्लेसिसची विकेट घेतली. त्याला सात चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १७ धावा करता आल्या. यानंतर सुयशने शाहबाज अहमदला पायचीत केले. वरुण चक्रवर्तीने ग्लेन मॅक्सवेलला आपला शिकार बनवले. त्याला पाच धावा करता आल्या. यानंतर कोहली आणि महिपाल लोमर यांनी चौथ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. लोमर धावगती वाढवताना वरुणच्या चेंडूवर रसेलकडे झेल देऊन बाद झाला. त्याला १८ चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३४ धावा करता आल्या.

दरम्यान, कोहलीने मोसमातील पाचवे अर्धशतक झळकावले. त्याने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. कोहलीचे आयपीएल कारकिर्दीतील हे ४९ वे अर्धशतक होते. मात्र, त्याच्या फलंदाजीत संघाच्या विजयापेक्षा स्वतःच्या विक्रमाची ओढ अधिक जाणवत होती. अर्धशतक झाल्याने कोहलीने व्यंकटेशच्या चेंडूवर रसेलकडे झेल देऊन परतीचा मार्ग पकडला. त्याला ३७ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ५४ धावा करता आल्या. त्यानंतर दिनेश कार्तिक १८ चेंडूत २२ धावा करून बेजाबदारपणे वरुणचा बळी ठरला. सुयश प्रभुदेसाई १० धावा आणि वनिंदू हसरंगा पाच धावा करून बाद झाला. डेव्हिड विली ११ धावा करून नाबाद राहिला आणि विजयकुमार वैशाकने १३ धावा केल्या. कोलकाताकडून वरुणने तीन विकेट घेतल्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याचवेळी सुयश शर्मा आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा