You are currently viewing पहिले पाऊल
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

पहिले पाऊल

*■■■■● जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गझलकार श्री जयराम धोंगडे यांनी “पहिले पाऊल” या कवी श्री.रघू देशपांडे यांच्या काव्यसंग्रहाचा घेतलेला रसास्वाद ●■■■■*

काव्यसंग्रह:
◆◆● पहिले पाऊल ●◆◆
कवी: रघू देशपांडे

फेसबुक, व्हाट्सअप्प या सोशल मिडीयाच्या अविष्काराला आभासी कसे म्हणू? या माध्यमातून कोणाचे तरी, काहीतरी लिहिलेले, शेयर केलेले आवडते आणि त्या आवडीतून मग ‘फ्रेंडशिप रिक्वेस्ट’ या दुव्याच्या मदतीने ‘मित्रजोड’ होते. कधी ‘फेविकॉल’ सारखे घट्ट तर कधी ‘अंबुजा सिमेंट’ सारखी ‘ये दिवार टूटेगी नही’ म्हणत मैत्री होते. माझं आणि रघुदादा यांचं मैत्रेय फेसबुकने जोडले. माझ्या गझला, कविता आणि अभंगादी त्यांना आवडू लागलं… त्याला त्यांची आणि त्यांच्या लिखाणाला माझी दाद मिळू लागली. माझा गझलसंग्रह ‘शब्दाटकी’ प्रकाशनपूर्व पैसे पाठवून ‘बुक’ करणारे दादा पहिले! ते ही नांदेडलाच असतात म्हणून मग त्यांना मी माझ्या ऑफिसमध्ये आमंत्रित करून त्यांना माझंच पण त्यांनी ‘बुक’ केलेलं ‘माझं बुक’ हाती दिलं. पहिलीच भेट… मग चर्चा, गप्पाटप्पा झाल्या आणि त्यांनीही खूप सारं लिहून तयार असल्याचे सांगितले. मी त्यांचे लिहिलेले साहित्य प्रकाशित करण्यासाठी त्यांच्या मागे लागलो आणि केलेल्या पाठपुराव्यातून त्यांचं ‘पहिले पाऊल’ हा काव्यसंग्रह साहित्यपंढरीत रुजू झाला. अतिशय प्रेमपूर्वक त्यांनी मला तो भेट दिला… वाचून मला आकललेला ‘रघू दा’ टिपण्याचा खटाटोप मला करावासा वाटतो.

माकडाचा माणूस झाला… किती युगे खर्ची पडली माहीत नाही… ह्याच माणसाने बुद्धीचा वापर करून स्वतःला विकसित केले… एवढे की पंचमहाभूतेही त्याने वश करून घेतली… जसजसा तो विकसित होत गेला तसतसा विकृतही! यातूनच माणसाने माणसाला चार वर्णात विभागले. ब्राह्मण, क्षत्रिय, आर्य आणि वैश्य… सवर्ण आणि शूद्र गट पाडून शूद्रांना पशुपेक्षाही हीन वागवण्याचे पातक सवर्णांनी केलं. आपल्याच रूढी, परंपरा, चालीरीतीमुळे पुन्हा माणसाचा माकड होण्याकडे सुरू असल्याचा हा प्रवास थांबावा अशी काहीशी संवेदना मला त्यांच्या खालील ओळीतून प्रत्ययास येते.

*रितीने बांधली गेली आनंदाची साधने*
*खुंटीस टांगले माझे पिढीजात सोवळे*

केवढे विशाल हे जग आहे. भिन्न जाती, धर्म, पंथ, भाषा, संस्कार, संस्कृती, सण-वार, वेष, भूषा घेऊन मिरवणारी माणसे इथे आहेत. माणूस समाजशील प्राणी आहे. सुखदुःखांत माणूस माणसाच्या कामी येतो. ग्रामीण जीवनात प्रेमभाव अधोरेखित होतो. शहरा-नगरात शेजाऱ्याची शेजाऱ्याला खबर नसते. तरीही माणसे माणसाला भेटत असतात. भेटीला कारणे असतील, निमित्त असेल, व्यवहार असेल परंतु अमक्याने तमक्याला केंव्हा आणि कधी भेटायचे ते ठरलेले असते. ही भेटीची, भेटीतून ऋणानुबंधाची परिभाषा व्यक्त करतांना रघू देशपांडे लिहतात…

*फेडणे राहिले होते गतजन्मी कर्ज बाकी*
*कारणावाचून तुझी मुलाकात होत नाही*

हे सत्य पटायला लागते. कदाचित कुठल्यातरी जन्माचे ऋण घ्यायला वा द्यायला ही भेट होत असावी.

*एकत्वाच्या भावनेने*
*ओथंबलेले मेघ*
*मग समरस होतात*
*क्षितिज रेषेपाशी…!*

*’जेथे सागरा धरणी मिळते, तेथे तुझी मी वाट पाहते’* म्हणजे नेमकी कुठे? ते त्या प्रियकर प्रेयसीला माहीत… पण भेटीची ओढ आणि आर्तता मात्र ऐकण्या-वाचणाऱ्याच्या काळजाचा ठाव घेते. वैशाख वणव्यात भाजून काहिली झालेल्या आर्त, तृषार्त धर्तीची तृष्णा त्या मेघांनाही पाहवत नाही. त्यालाही तिच्या भेटीची, मिलनाची ओढ असते. आणि या जाणिवे-नेणिवेतून तो धो-धो कोसळतो. सारे नद्या-नाले ओसंडून वाहू लागतात… या भरलेल्या नद्या पुन्हा सागराला मिळतात… जिथे सागर धरेला भिडला त्या क्षितीजाला हात लावण्यासाठीचा हा प्रवास, देशपांडे असा कल्पक ओळीतून मांडतात, ते मनाला भावुन जातं!

*आपल्या उपस्थितीचे*
*सुतक येऊ लागले,*
*ओझे होऊ लागले की,*
*समजावे वय झाले..!*

माणूस जीवाचा आटापिटा करून, राबराब राबून बायको-पोरांची देखभाल करतो. सारं सुख, चैन-चंगळ-मंगळीची गंगा घरापर्यंत आणण्यासाठी हा कुटुंबवत्सल ‘भगीरथ’ प्रयत्नशील असतो. आपसूकच त्याचा मानसन्मान, मानमरातब सर्वजण राखून असतात. या कर्त्याच्या आदेशाबरहुकूम संसाराचा गाडा हाकला जातो. हे चित्र घरोघरी, कुटूंबाकुटुंबातून आपण पाहतो. मग मुलं कळती होतात… मोठी होतात… कमावती होतात. मायबापाच्या परवानगीशिवाय काहीही न करू धजावणारी लेकरं हाती पैसा आला की या कर्त्याला न विचारता कर्तीधर्ती होतात. त्यांच्या बोलण्याकडे कानाडोळा करतात. खरेतर आता त्यांनी काही बोलूच नये असा वागण्याचा अविर्भाव त्यांच्या देहबोलीतून उधृत होतांना ‘याची देही, याची डोळा’ पाहतांना त्याला वेदना होतात. या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या अभाग्यास मोलाचा सल्ला देतांना रघुजी चपखलपणे या ओळी लिहून जातात.

‘पहिले पाऊल’ या त्यांच्या पहिल्याच काव्यसंग्रहात त्यांनी काव्याच्या अनेक विधा हाताळल्यात. काव्यांजली, निशुशब्दीका, लिनाक्षरी अशा काव्यप्रकाराबरोबर अभंग, मुक्तछंद कविता, अष्टाक्षरी, गझल इ. प्रकार सक्षमतेने हाताळले. अतिशय भावुक, संवेदनशील आणि प्रेमळ मनाच्या रघु दादाला प्रामाणिकपणे वाटते की,

*घोंगावले जरासे आकाश आज माझे*
*वृत्तात बांधले मी शब्दात शेर झाले!*

असेच आपल्या विचाराचे आकाश व्यापक व्हावे, काव्य सर्वसमावेशक व्हावे, मराठी साहित्य समृद्ध करण्यासाठी आपली लेखणी नेहमी सरसावत राहावी यासाठी मी आपणास सुयश चिंतितो… आणि पुढील लेखन प्रवासास माझ्या भरभरून शुभेच्छा देतो!

*जयराम धोंगडे,*
नांदेड
९४२२५ ५३३६९


प्रतिक्रिया व्यक्त करा