You are currently viewing सावंतवाडीचा आठवडा बाजार “होळीचा खुंट” परिसरात हलविणार…दीपक केसरकर

सावंतवाडीचा आठवडा बाजार “होळीचा खुंट” परिसरात हलविणार…दीपक केसरकर

नव्या व्यापारी संकुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन…

सावंतवाडी

येथील आठवडा बाजार मोती तलावाच्या भोवती घेण्यात येत असल्यामुळे परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे. व्यापाऱ्यांना सुद्धा त्याचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरच हा बाजार होळीचा खुंट परिसरात हलविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान नव्याने शहरात उभारण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या पुनर्बांधणीसाठी २५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यातील साडे बारा कोटी निधी मुख्यमंत्र्यांनी दिल्याने त्यांच्याच हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सावंतवाडीत नव्याने उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाच्या पार्श्वभूमीवर आज केसरकर यांनी पालिका पदाधिकारी व व्यापाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, माजी नगरसेविका अनारोजीन लोबो, राजन पोकळे, व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदी सह अधिकारी व व्यापारी उपस्थित होते.संत गाडगेबाबा भाजी मंडई नव्याने बांधण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक व्यापाऱ्यांचे तात्पुरते पुनर्वसन केले जाणार आहे.या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत नंतर ते बोलत होते.
यावेळी संत गाडगेबाबा भाजी मंडई बसणाऱ्या विक्रेत्यांना तेथील वसंत प्लाझा ते गोल्डन बेकरी, मॅंगो हॉटेल ते फिश मार्केट,कळसुलकर हायस्कूल पर्यंत गेलेल्या नाल्याच्या भागावर बसण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे तसेच स्टेट बँक,पेट्रोल पंप, आणि तीन नंबर शाळेच्या परिसरातील पार्किंगच्या जागेवर काही व्यापार्यास  बसण्यास दिले जाणार आहे ,असे त्यांनी सांगितले. यावेळी सर्व व्यापारी व नागरिकांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले

प्रतिक्रिया व्यक्त करा