You are currently viewing सिंधुदुर्गात “जागरूक पालक- सुदृढ बालक” अभियानाला आज पासून सुरुवात…

सिंधुदुर्गात “जागरूक पालक- सुदृढ बालक” अभियानाला आज पासून सुरुवात…

० ते १८ वयोगटात होणार बालकांची तपासणी; जिल्ह्यात १९७ आरोग्य पथके कार्यरत…

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात “जागरूक पालक- सुदृढ बालक” अभियान आज पासून राबविण्यात येत असून या अभियानात ० ते १८ वयोगटातील १ लाख ४१ हजार ३५७ बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात १९७ आरोग्य पथके कार्यरत ठेवली आहेत. अशी माहिती जिल्हा परिषद माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ० ते १८ वयोगटातील मुलांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तर या आरोग्य तपासणीच्या कामासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाची १९१ व जिल्हा सामान्य रुग्णालय ६ अशी एकूण १९७ आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. या अभियान कालावधीत शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील ८७ हजार ५०१ बालके, खाजगी शाळाची १५ हजार ६७३, आश्रम शाळा ४९, दिव्यांग शाळा १५१ ,अंगणवाडी ३४ हजार ५२६, खाजगी नर्सरी बालवाडी २ हजार ७५३, बाल सुधार गृह ४, समाज कल्याण व आदिवासी विभाग वस्तीगृहे १०६, आणि शाळाबाह्य मुले ५८४ अशी एकूण १ लाख ४१ हजार ३५७ मुलांची आरोग्य तपासणी या अभियान कालावधीत करण्यात येणार आहे.
या तपासणीमध्ये नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखणे, रक्तशय, डोळ्यांचे आजार, गलगंड, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कॅन्सर, अस्थमा अशा आजारांच्या संशयित रुग्णांना ओळखून त्वरित संदर्भित करणे. तसेच दुभंगलेले ओट व टाळू, मोतीबिंदू, बहिरेपणा, जीवनसत्व अ ,ड, ब ,याची कमतरता, वाढ खुंटने, लठ्ठपणा, याचाही शोध घेतला जाणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करून आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे, गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरवणे, सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दल स्थापन करून या आरोग्य अभियान कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनानुसार कालबद्ध पद्धतीने आठ आठवड्यात हे अभियान पूर्ण करावयाचे आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यात नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ सई धुरी यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 7 =