सिंधुदूर्ग :
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेले शिवसेनेचे कोकणातील दबंग आमदार वैभव नाईक पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आलेले आहेत. गेले काही दिवस आमदार वैभव नाईक यांची एसीबी कडून चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारावर सूड भावनेतून कारवाई होते की काय…? अशी शंका उपस्थित केली जात होती. परंतु आमदार वैभव नाईक यांच्याकडे यावेळी पोलिसांची वक्रदृष्टी वळली आहे ती कनेडी बाजारपेठ येथील ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांच्या राडाच्या पार्श्वभूमीवर…! पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असून शिवसेना ठाकरे गट आणि भाजप या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांसह आमदार वैभव नाईक यांना या राडा प्रकरणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या तक्रारीवरून आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या गुप्तपणे कारवाया सुरू असल्याचे समजते. कनेडी बाजारपेठ येथे २४ जानेवारी २०२३ रोजी शिवसेना ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होत जोरदार राडा झाला होता. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी हातात दांडा घेऊन कार्यालयातून बाहेर पडत कनेडी बाजारपेठेत विरोधी गटावर चाल करून जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दोन्ही गटाचे शेकडो कार्यकर्ते कनेडी बाजारपेठेत दाखल झाल्याने वातावरण जास्त तापले होते. परंतु तात्काळ सावधगिरी बाळगत पोलीस प्रशासनाने अतिरिक्त पोलीस कुमक मागवून कनेडी बाजारपेठेतील राड्यावर नियंत्रण मिळवले होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्याची प्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा ०४ फेब्रुवारी रोजी असल्याने तेथे उसळणारी गर्दी पाहता अतिरिक्त पोलीस कुमक जत्रोत्सवाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी रवाना झाली होती. त्यामुळे कनेडी बाजारपेठेतील राडा प्रकरणी गुन्हा दाखल होऊन देखील कोणावरही तात्काळ कारवाई करण्यात आली नव्हती. आंगणेवाडी जत्रोत्सवानंतर कणकवली पोलीस ॲक्शन मोडवर आले असून या राडा प्रकरणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटाचे दबंग आमदार वैभव नाईक यांना देखील अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाच्या गुप्तपणे सुरू असलेल्या हालचालींमुळे पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण तापते की काय? अशी भीती वाटू लागली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गट व भाजपच्या गुन्हे दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आज रात्री उशिरा किंवा उद्या कार्यकर्ते स्वतःहून हजर न झाल्यास कोणत्याही क्षणी त्यांना अटक केले जाण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून माहिती घेतली असता तशा प्रकारच्या कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचेही सांगण्यात येत आहे.