You are currently viewing मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दरीत फेकताना दुसराही कोसळला दरीत

मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दरीत फेकताना दुसराही कोसळला दरीत

सावंतवाडी

मारहाणीत मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह आंबोली दरीत टाकताना साथीदाराचा पाय घातल्याने तो सुध्दा दरीत कोसळला. यामुळे निर्जनस्थळी मृतदेह टाकून त्यावर पडदा टाकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सावंतवाडी पोलिसांत खबर देण्यात आली असून या प्रकाराने खळबळ माजली आहे.

उसनवार घेतलेले पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने भाऊसो माने व त्याचा साथीदार तुषार पवार यांनी दहा दिवसांपूर्वी सुशांत खिल्लारे याला पंढरपूर येथून आपल्या ताब्यात घेत कराड येथे आणून ठेवले होते. त्यानंतर २९ जानेवारी रोजी रात्री एका ठिकाणी दारूच्या नशेत भाऊसो व सुशांत या दोघांचे भांडण झाले. भांडणाच्या ओघात मारहाण केल्याने त्यात सुशांत याचा मृत्यू झाला. त्यानंतर ३० रोजी सकाळी त्याला गाडीत घालून आंबोलीच्या दिशेने आणले. काळोख पडल्यानंतर रात्री सातच्या सुमारास सुशांत याचा मृतदेह दरीत फेकण्याचा प्रयत्न करताना भाऊसो माने हा देखील दरीत कोसळला. त्यानंतर तुषार हा रात्रभर गाडीतच थांबला. आज सकाळी त्याने नातेवाईकांना फोन करून भाऊसो हा पाय घसरून दरीत कोसळला असल्याची माहिती दिली. त्यामुळे हा सारा प्रकार उघड झाला.

दरम्यान, रात्री उशिरा अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात भेट देत पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकाराबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली. नेमका हा प्रकार कधी व कोठे झाला ? तसेच तुषार पवार देत असलेली माहिती खरी आहे का ? याबाबत पोलीस अधिक तपास करणार आहेत. पोलीस याबाबत अधिक माहिती घेत असून यासाठी कराड पोलिसांची ही मदत घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेबाबत तुषार पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची बाब उघड झाली असली तरीही तो देत असलेली माहिती नक्कीच खरी आहे का ? की यात अन्य कोणाचा सहभाग आहे ? किंवा दोघांचाही मृत्यू आधीच झाला होता ? याबाबत पोलीस तपास करणार आहेत. सध्या तरी भाऊसो हा पाय घसरून दरीत कोसळला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच आर्थिक देवघेवीतूनच हा प्रकार घडल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र अधिक तपासानंतरच नेमके सत्य काय हे पुढे येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा