You are currently viewing प्रजासत्ताक चिरायू होवो…
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

प्रजासत्ताक चिरायू होवो…

*मराठी साहित्य मंडळ, परभणी जिल्हाध्यक्षा डॉ.संगीता जी. आवचार लिखीत अप्रतिम लेख*

*प्रजासत्ताक चिरायू होवो…*

“हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे”
– ग. दि. माडगूळकर

सुप्रसिद्ध कवी ग. दि. माडगूळकर यांच्या वरील काव्यपंक्तीत व्यक्त झालेले अजरामर राष्ट्रप्रेम अगणित स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातून प्राप्त झाले आहे हा इतिहास सर्वज्ञात आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्यप्राप्ती झालेल्या भारत देशाने 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताकाचा स्विकार करून भारतीय जनतेला लोकशाही मार्गाने राज्य कारभाराचा हक्क बहाल केला. लोकशाही अर्थात लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य या पावन मूल्याचे वहन करण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली तो हा प्रजासत्ताक दिन! स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा होत असताना 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा दुग्ध शर्करा योग आला आहे!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वर्गीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अविरत परिश्रमाने तयार झालेले संविधान भारताने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्विकारले आणि त्याच्या अंमलबजावणीस 26 जानेवारी 1950 पासून सुरूवात झाली म्हणूनच 26 जानेवारी हा प्रजासत्ताकदिन आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. या दिवशी संपूर्ण देशात उत्साहाने ध्वजारोहण करून संविधानाचे स्मरण केले जाते, तसेच जनतेचा राज्य करण्याचा हक्क अबाधित असल्याची ग्वाही दिली जाते.

आजच्या प्रजासत्ताकदिनी एक राष्ट्र म्हणून जागतिक पटलावर वाटचाल करत असताना देशाचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षणव्यवस्था, लष्करी सुसज्जता, दरडोई उत्पन्न, नागरिकांचे राहणीमान, देशाचा चौथा स्तंभ असणारी पत्रकारिता, अंतरराष्ट्रीय संबंध, राज्यकर्त्यांची संवेदनशील आश्वासकता या सर्व राष्ट्रहिताच्या बाबीत राष्ट्राचा निर्देशांक हा अत्यंत उच्चदर्जाचा असावा लागतो.

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत अंतर्बाह्य सर्वसमावेशकताच आजमितीस भारत देशाला जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी उपकारक ठरू शकते हे निर्विवाद सत्य होय.

विविधतेत एकता साधणाऱ्या भारतीय परंपरांचे नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिमाखदार संचलन केले जाते. या संचलन सोहळ्यात भारताच्या प्रत्येक राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशास प्रतिनिधीत्व करण्याची संधी प्राप्त होते. भारतीय सेनेच्या तिन्ही दलांचे शक्ती प्रदर्शन या संचलन सोहळ्याचे मुख्य आकर्षण असते. जाती, धर्म, पंथ, भाषा अशा वैविध्याने नटलेल्या मनोरम संस्कृतींचा मिलाप या निमित्ताने चित्ररथाच्या रूपाने भारतीय नागरिकांच्या राष्ट्रचेतना जागवतो. भारतातील सर्व राज्ये स्वत:च्या संस्कृतीचे जल्लोषात प्रदर्शन करतात, त्याचबरोबर विविधतेत एकता या तत्त्वाचे पालन करण्याच्या बांधिलकीचा पुनरुच्चार करतात. या संस्कृती दर्शनातून जागतिक पातळीवर राष्ट्रीय एकतेचे विहंगम परिदृश्य या दिवशी सर्वदूर पोहचते.

असंख्य अनाम वीरांच्या बलिदानातून प्राप्त झालेले हे स्वातंत्र्य प्राणपणाने जपणे हे भारताचे जबाबदार नागरिक म्हणून आपले परमकर्तव्य ठरते. सातत्याने केवळ राजकारण आणि राजकारणी यांच्याविषयी चर्चा करत असताना आपण जबाबदार नागरिक बनून आपली कर्तव्ये बजावत आहोत का याचाही उहापोह देशाचा अमृत महोत्सव व 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा साजरा करताना प्रामुख्याने करणे क्रमप्राप्त ठरते.
राजकारण आणि राजकारणी आपलेच प्रतिनिधित्व करतात हे विसरून कसे चालेल?

सांप्रत, या देशाच्या प्रत्येक नागरिकाने आपल्या स्वतःच्या स्वातंत्र्यावर अतीव प्रेम करताना इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही हे साधेसुधे तत्त्व आचरणात आणले तर व्यक्तीस्वातंत्र्याच्या पायमल्लीचा प्रश्नच उद्भवणार नाही. कारण ज्यांना स्वातंत्र्याचा अर्थ समजतो त्या सुजाण नागरिकांकडून अशा प्रकारचा प्रमाद कदापिही शक्य नाही!

पुढचा महत्त्वाकांक्षी मुद्दा आहे तो देशाच्या प्रगतीमध्ये आपापला वाटा उचलण्याचा. एक जबाबदार आणि समर्थ नागरिक म्हणून या देशाच्या प्रत्येक नागरिकाने देशाच्या प्रगतीत स्वतःचा वाटा उचलण्यासाठी आपल्याकडे सोपवण्यात आलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे, सचोटीने निर्वहन करणे गरजेचे आहे. केवळ व्यवस्थेतील दोष दाखवून आणि सतत इतरांकडे बोट दाखवून भागणार नाही. कारण व्यवस्था आपल्या सर्वांची मिळून बनलेली आहे. व्यवस्थेत राहून एक आणि व्यवस्थेच्या बाहेर राहून दुसरे रूप धारण करणे यामुळेच राष्ट्राची अधोगती होत असते. हे राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीवर सर्वत्र सत्य आहे. भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारत 2020 हे स्वप्न पाहिले तेव्हाच हे स्पष्ट केले होते की भारताला महासत्ता बनण्यासाठी आपण नागरिक म्हणून आपल्या राष्ट्रीय कर्तव्यांचा केवळ विचार न करता त्यांचे जबाबदारीने पालन करणे आवश्यक आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून आपण आजही विकसनशील देशांच्या रांगेमध्येच उभे आहोत. जगभरातील वरच्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आणि तुल्यबळ लष्करी शक्ती असून अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण असून देखील हे ‘विकसनशीलतेचे’ बिरुद ‘विकसित’ मध्ये परावर्तीत करण्यासाठी आपण आपल्या भूमिकांचे पुनरावलोकन करणे आवश्यक बनले आहे.

आपल्याकडे प्रचंड मनुष्यबळ उपलब्ध असताना, आपण जगातील सर्वात जास्त तरुणांचा देश असताना, जागतिक दर्जाचे संशोधन, शास्त्रज्ञांची संख्या आणि प्रमाण, ऑलंपिक मधला आपला सहभाग आणि गुणवत्ता या आणि अशा प्रकारच्या अनेक याद्यांमध्ये आपण तळाशी का आहोत?याचा अमृत महोत्सवी वर्षांत साजरा करण्यात येत असलेल्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विचार करणार आहोत की कसे? वर वर पाहता सर्व काही आलबेल वाटत असले तरीही या देशाच्या तरुणाईला योग्य मार्ग दाखवणे, त्यांच्यात असलेल्या प्रचंड ऊर्जेचा सकारात्मक वापर करायला तरुणाईला प्रवृत्त करणे यासाठी विशेष प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे याची अमृत महोत्सवी वर्षांत संपन्न होत असलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून जाणीव झाली.

“दुरितांचे तिमीर जाओ, विश्व स्वधर्म सुर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात” हे संत ज्ञानेश्वरांनी विषद केलेले मानव कल्याणाचे पसायदान या राष्ट्राच्या तरुणाईत रुजविण्यासाठी आपण आपल्या वैचारिक क्षमतांची बैठक वृद्धिंगत करणे नितांत गरजेचे आहे यात तिळमात्र शंका नाही.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तंत्रज्ञानाचा मानव जातीच्या कल्याणासाठी अंगीकार करण्याविषयी देखील धोरणात्मक आखणी करण्याची एक सुवर्णसंधी या अत्याधुनिक सुविधांच्या मांदियाळीत आपल्या हाती आली आहे, संधीचे सोने करणे सर्वार्थाने नागरिक म्हणून आपल्या भूमिकेवर अवलंबून आहे.

राज्यघटनेच्या तत्त्वांचा तसेच शैक्षणिक मूल्यांचा आधार घेऊन आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेट आणि समाजमाध्यमांच्या आहारी जाणार्‍या पिढ्यांना कुठेतरी चाप लावणे ही शिक्षणव्यवस्थेची प्राथमिक जबाबदारी ठरते आहे.
कोरोनासारख्या महामारीच्या संकटाला भारतासारख्या विशालकाय लोकसंख्येच्या देशाने समर्थपणे तोंड दिले ही निश्चितच गौरवास्पद बाब आहे, पण त्या बरोबरीने वैद्यकीय व्यवसायातील नैतिकतेच्या मुद्द्यांवर झालेल्या चर्चांनी समाज म्हणून आपल्यातील अवगुण आणि औदासिन्य देखील पुरते उघडे पडले. समाजातील विविध घटकांनी आपल्या जबाबदार्‍या पार पाडताना आपले स्वार्थ आणि परमार्थ सुद्धा खुलेपणाने समाजासमोर आले.

74 व्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने या राष्ट्राच्या उज्ज्वल परंपरांचे पाईक म्हणवणारे आपण सुजाण नागरिक कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक जबाबदार्‍यांचा पुनर्विचार करण्यासाठी बाध्य आहोत. त्याचाच एक भाग म्हणून कौशल्याधिष्टीत भावी पिढ्यांचे निर्माण ही आपली प्राथमिक जबाबदारी असणार आहे. तरुणांच्या संख्येत अव्वल असणार्‍या आपल्या देशाने तरुणांच्या हाताला काम, मेंदूला मानवतेचा विचार आणि मनाला वैयक्तिक, कौटुंबिक तथा सामाजिक भावनांचा ओलावा देणे आपले राष्ट्रीय परम कर्तव्य आहे. बेरोजगारीच्या बिकट संकटातून वाट काढण्यासाठी जास्तीत जास्त उद्योगाभिमुख धोरण राबवणे, स्वयंरोजगार निर्मितीवर भर देणे, व्यवसाय प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिरे यांचे सातत्याने आयोजन करणे अशा विविध पातळ्यांवर कृतिशील धोरण राबवणे ही काळाची गरज आहे. विविध विकास योजना आणि धोरणे मुबलक प्रमाणात अस्तित्वात आहेत, हे सर्व संबधित घटकांपर्यंत पोहचवणे आणि त्यांच्यातील शक्तीला आत्मविश्वासाचे कोंदण पुरवणे यावर गांभीर्याने कार्यवाही करत नियमितपणे पाठपुरावा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
या देशाच्या पत्रकारितेने देखील कात टाकून आपली ‘चौथा स्तंभ’ ही भूमिका चोखपणे बजावण्याची वेळ आलेली आहे. या देशातील पराक्रमाच्या, प्रगतीच्या, संस्कृती रक्षणाच्या, संत – महात्म्यांच्या, मानवतेच्या अफाट कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांच्या वीरश्रीयुक्त कहाण्या अविरतपणे देशातील तरुणाई समोर ठेवताना त्यांची मने कलुषित होणार नाहीत याचा समग्र विचार व्हायलाच हवा. ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेताना आपल्या राजकीय स्वार्थापोटी भावी पिढ्यांना अल्पवयातच थोर महापुरुष आणि संत-महात्मे यांच्या विषयी विद्वेषपूर्ण भूमिका घ्यायला लाऊन आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजण्याच्या अघोरी वृत्तीला तिलांजली देणे क्रमप्राप्त आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एवढीच माफक अपेक्षा!

-डॉ. संगीता जी. आवचार,
उपप्राचार्य व इंग्रजी विभाग प्रमुख,
कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी – 431 401
महाराष्ट्र
चल भाष्य : 9767323290

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × five =