You are currently viewing ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या अभ्यास वर्गाचा ग्राहकांना निश्चित फायदा होईल – डॉ.विजय लाड

ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या अभ्यास वर्गाचा ग्राहकांना निश्चित फायदा होईल – डॉ.विजय लाड

वैभववाडी.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या आठ दिवसाच्या राज्यस्तरीय अभ्यास वर्गाचा फायदा कार्यकर्त्यांसोबतच ग्राहकांना निश्चित होईल असे प्रतिपादन राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांनी केले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र, जळगाव जिल्हा शाखा आणि नाशिक विभाग यांच्यावतीने दि.१५ ते २२ आॕक्टोबर या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने फेसबुक व युट्यूब चॅनलवर लाईव्ह पध्दतीने आयोजित समारोप प्रसंगी बोलत होते.

दररोज सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत आठ दिवस दोन सत्रे संपन्न झाली. यामध्ये पहिल्या दिवशी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड, नाशिक विभाग अध्यक्ष प्रा. बाबासाहेब जोशी यांनी अभ्यास वर्गाचे उद्धघाटन करुन मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात राज्य सहसंघटक सौ.मेघाताई कुलकर्णी यांनी कार्यकर्ता कसा असावा, दुसऱ्या दिवशी पुणे येथील अनिल जोशी यांनी वीज ग्राहक, हीरालाल ठाकुर बैंकिंग, तिसऱ्या दिवशी राज्य संघटक सर्जेराव जाधव व नाना पाटील भुसावळ यांनी बी- बियाणे व खते खरेदी करतांना घ्यावयाची काळजी, चौथ्या दिवशी विदर्भ प्रांतअध्यक्ष शामकांत पात्रीकर नागरी समस्या, राज्य सचिव अरुण वाघमारे ग्राहकाभिमुख प्रशासन, पाचव्या दिवशी गुरुनाथ बहिरट व डॉ.योगेश सूर्यवंशी यांनी प्रवासी ग्राहक, सहाव्या दिवशी डॉ. भूषण मोरे सहआयुक्त अन्न वऔषध प्रशासन, ठाणे यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, उपनियंत्रक वैधमापशास्त्र नितिन जोशी यांनी वैधमापन शास्त्र कायदा, सातव्या दिवशी नाशिक विभाग संघटक अरुण भार्गवे ग्राहक संरक्षण परिषद, डॉ.आत्माराम महाजन ऑनलाइन खरेदी व समारोपाच्या आठव्या दिवशी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच सदस्य श्रद्धा बहिरट यांनी ग्राहक काल,आज आणि उद्या, अध्यक्ष ग्राहक तक्रार निवारण मंच अॕड. संजय बोरवाल ग्राहक कायदा तर अॕड.श्रीधर व्यवहारे गुंतवणूक करतांना घ्याव्याची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले.

दोन ते अडीच तास राज्यातील सर्व साधकांसाठी विविध विषयातील तज्ञ मान्यवरांनी आपल्या ज्ञानपुष्प प्रबोधनासाठी स्व.ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांना अर्पण केले. या सोळा तासात ग्राहक चळवळीतील एक कार्यकर्ता घडण्यासाठी साधकांवर षोडश संस्कार केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी टीम जळगावचे जिल्हाअध्यक्ष मनोज जैन, संजय शुक्ल, तंत्रज्ञानाचा शिवधनुष्य यशस्वी पणे सांभाळणारे महेशजी चावला व नवीन चावला यांनी सांभाळून कार्यक्रम यशस्वीतेसाठी उदय अग्निहोत्री, सतीश गढे, गुरूबंक्ष जाधव यांनी परिश्रम घेतले. या आॕनलाईन अभ्यासवर्गाचा लाभ संस्थेचे पदाधिकारी, विभाग, जिल्हा व तालुका शाखा पदाधिकारी सदस्य व हजारो ग्राहकांनी घेतला. संस्थेच्यावतीने यापुढेही नवीन उपक्रम राबवू असे आयोजकांनी जाहीर केले. अशी माहिती प्रभारी उपाध्यक्ष- कोकण विभाग- ग्राहक पंचायत महाराष्ट्र व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन पाटील, संघटक एकनाथ गावडे व कोषाध्यक्ष संदेश तुळसणकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा