You are currently viewing मातृभाषेत शिक्षण बंधनकारक केले जाणार असल्याने मराठी शाळांना चांगले दिवस येतील – दीपक केसरकर

मातृभाषेत शिक्षण बंधनकारक केले जाणार असल्याने मराठी शाळांना चांगले दिवस येतील – दीपक केसरकर

विनाअनुदानित शाळा आणि शिक्षक सेवकांसाठी साडेअकराशे कोटीचे पॅकेज…

सावंतवाडी

विद्यार्थ्यांचा ओढा इंग्रजी माध्यमांकडे वळत असल्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे. मात्र येत्या काळात मातृभाषेत शिक्षण घेणे बंधनकारक करण्याबरोबरच “डिप्लोमा-इंजीनियरिंग” सारखे अभ्यासक्रम सुद्धा मराठीत शिकविले जातील. तसा निर्णय केंद्र स्तरावरच घेण्यात आला आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद पडून शिक्षकांच्या नोकऱ्या जातील अशी जर कोणी भीती पसरवत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे केले. दरम्यान विनाअनुदानित शाळा आणि शिक्षक सेवकांसाठी साडेअकराशे कोटीचे पॅकेज आमच्या सरकारने जाहीर केले आहे. त्यात शिक्षक सेवकांचे वेतन सुद्धा दुप्पट करण्यात आले आहे. आता येत्या काळात शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्नही सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

कोकण विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी शिंदे गट आणि भाजप युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित शैक्षणिक संघटनांच्या स्नेह मेळाव्यात श्री.केसरकर बोलत होते.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, राष्ट्रीय मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष चिंतामणी तोरस्कर, सिंधुदुर्ग मुख्याध्यापक संघाचे सचिव गुरुदास कुसगावकर, राजेंद्र माणगावकर, सिंधुदुर्ग मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष रामचंद्र घावरे, बबन उर्फ नारायण राणे, सुजित कोरगावकर, प्रसन्ना देसाई, प्रतीक बांदेकर आदींसह मोठ्या संख्येने भाजप व बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील विविध शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री.केसरकर म्हणाले, इंग्रजी माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढत असल्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे. त्याचे कारण म्हणजे इंग्रजी माध्यमामधून शिक्षण घेतल्यानंतर पुढे प्रगती करता येते अशी येथील पालकांची आणि विद्यार्थ्यांची धारणा झाली आहे. सुरुवातीपासूनच इंग्रजी माध्यमांचे शिक्षण घेतल्यानंतर डिप्लोमा इंजीनियरिंग सारखे इंग्रजीत शिकवले जाणारे अभ्यासक्रम सोपे होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात पाठविले जाते. मात्र आता हे अभ्यासक्रम सुद्धा मराठीत करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच मातृभाषेत शिक्षण घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. येत्या काळात या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद पडून शिक्षकांच्या नोकऱ्या जातील, अशी भीती जर कोणी पसरवत असेल तर त्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणाही शिक्षकाच्या नोकरीवर गदा येणार नाही यासाठी आमचे सरकार तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास त्यांनी दिला.

श्री. केसरकर म्हणाले, येत्या काळात जरी मातृभाषेत शिक्षण घेणे बंधनकारक केले जाणार असले तरी ते तेवढेच ऍडव्हान्स सुद्धा असणार आहे. ज्ञान सगळ्यात चांगले मातृभाषेतून मिळते त्यामुळे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना देखील होईल. इंग्रजी अभ्यासक्रमाची जबरदस्ती ही इंग्रजांच्या काळापासून झाली आहे. मात्र त्यात बदल करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकार घेत आहे. आणि तसे झाल्यास मातृभाषेतून शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना सुद्धा सोपे होईल. आणि त्यांची आकलन शक्ती सुद्धा वाढेल, असा विश्वास त्यांनी दिला. तर मराठी शाळा बंद पडतील आणि तुमच्या नोकऱ्या जातील, अशी भीती सध्या शिक्षकांमध्ये पसरविली जात आहे. मात्र अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, तुमच्या नोकऱ्यांवर गदा येणार नाही यासाठी सरकार कायम तुमच्या पाठीशी आहे. आता वेळ तुमची आली आहे. कोकण विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी तुमच्यातीलच एक तडफदार आणि तरुण उमेदवार रिंगणात आहे. त्यांना विजयी करण्यासाठी प्रचारात भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठी कंबर कसली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा मतदार म्हणून त्यांच्या पाठीशी राहून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =