You are currently viewing पहाट झाली

पहाट झाली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*पहाट झाली*
————————

गारठलेली झाडे, वेली
थिजून गेले ते गिरीकंदर
फुले, पाखरे मिटून घेती
आकाशाचे विझले झुंबर

काळोखाच्या दुलई खाली
दबकत दबकत रात्र वाढते
निर्मनुष्यशा रस्त्यामधुनी
वर्दळ सारी पाय काढते

शहारणाऱ्या अर्ध्या रात्रीं
सोसाट्याचे सुटले वारे
मुकेपणातच मिटून घेती
घरट्या मधले विहंग सारे

उत्तर रात्रीं पहाट वेळी
सृष्टी सारी दंवात न्हाते
काळोखाची सुन्न रात्र ती
हळू हळू मग संपत जाते

कधी तरी मग बागे मध्ये
जास्वंदीची कळी उमलते
चैतन्याने उतून आल्या
प्राजक्ताशी झुलू लागते

मंद मंद मग दर्वळ सारा
फुलाफुलांना सांगत जातो
कर्दमातली रात संपली
पहाट झाली पहाट झाली.

श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित
17.02.2023.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + 20 =