You are currently viewing कोकण कला शिक्षण संस्थेच्या वतीने परप्रांतीय कामगारांना उबदार कपडे, चादरी, चटया तसेच ब्लॅंकेटचे वाटप

कोकण कला शिक्षण संस्थेच्या वतीने परप्रांतीय कामगारांना उबदार कपडे, चादरी, चटया तसेच ब्लॅंकेटचे वाटप

बांदा

सध्या कडाक्याची थंडी सुरु असून पुणे शहराचा पारा देखील ८ अंशच्या खाली घसरला आहे. अशा थंडीत पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करून शहरात कामासाठी आलेले परप्रांतीय कामगार राहण्यासाठी घर नसल्याने रात्री रस्त्याच्या कडेलाच राहतात. या लोकांना थंडीत मायेची उब मिळावी यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने मुंबई व पुणे शहरात उबदार कपडे, चादरी, चटया तसेच ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो.

गारठवणाऱ्या ऐन थंडीत कामगारांची अनेक कोवळी मुले पाय पोटात घेऊन कुडकुडत झोपलेली असतात. अशा थंडीमुळे कित्येक मुले सर्दी, ताप, श्‍वसनविकार, दमा, कोरडा खोकला, अशा अनेक विषाणूजन्य आजाराला देखील बळी पडतात.


अशा आजारांपासून रस्त्यावरील लोकांना वाचवण्यासाठी आणि थंडीत त्यांच्या मुलांना मायेची ऊब देण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या भागात कोकण कला व शिक्षण विकास संस्था ऊबदार कपड्यांचे वाटप करते. यावर्षी देखील बेघर व कष्टकरी लोकांना मुंबईतील दादर परिसर आणि पुणे येथील कात्रज परिसरातील शेकडो कुटुंबियांना संस्थेकडून ब्लॅंकेट्सचे वाटप करण्यात आले.
यावेळी या वाटपात संस्थेकडून अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबईतील वाटपात सुरज कदम, साक्षी पोटे, बिना अहिरे, ऋतुजा पवार आणि योगिता निजामकर तर पुणे येथे विशाल महांगरे, आरती भोज, पुनम सुतार आणि श्वेता जैन यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन कडाक्याच्या थंडीचा देखील अनुभव घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + 8 =