You are currently viewing कुंदे येथे काजू पिक शेतीशाळा संपन्न

कुंदे येथे काजू पिक शेतीशाळा संपन्न

कुडाळ :

महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांचे मार्फत कुंदे भटवाडी येथे शनिवार दि. 23 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता काजू पिकाच्या शेतीशाळा व प्रक्षेत्र दिनाचे आयोजन करण्यात आली होते.

यावेळी उपस्थित काजू बागायतदार शेतकऱ्यांना प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत कार्यरत कीटक शास्त्रज्ञ विजयकुमार देसाई यांनी काजूची लागवड, एकात्मिक खत व्यवस्थापन, प्रमुख कीड – रोगांची ओळख व त्यांचे नियंत्रण याबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रक्षेत्र दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना काजू बागेतील कीड व रोगांचे निरीक्षणे कशी घ्यावित, त्यांची लक्षणे कोणती या संदर्भात प्रात्यक्षिक संशोधन सहयोगी डॉक्टर गोपाळ गोळवणकर यांनी करून दाखवले.

सदर शेतीशाळेस कुडाळ तालुक्यातील कूंदे या गावातील कृषी पर्यवेक्षक श्री. ए. टी. परब, कृषी सहाय्यक श्री. साईनाथ तांबोळी यांच्या समवेत एकूण 25 शेतकरी उपस्थित होते. कृषी सहाय्यक साईनाथ तांबोळी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन केले. तसेच त्यांनी नवीन आर्थिक वर्षातील कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांना त्यांच्या लाभ घेण्याचे आवाहन केले. कृषी पर्यवेक्षक ए. टी.परब यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या योजनेबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांना त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन करून आभार प्रदर्शन केले. शेतीशाळेला उपस्थित शेतकऱ्यांनी प्रक्षेत्र भेटीदरम्यान काजू बागेत भेडसावणाऱ्या समस्या व प्रश्न विचारून त्यावर सखोल चर्चा करण्यात आली व काजू पीक संरक्षणासाठी लघु मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + thirteen =