आडाळीची फाईल अजूनही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडेच – प्रमोद जठार

आडाळीची फाईल अजूनही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडेच – प्रमोद जठार

वनौषधी प्रकल्प न झाल्यास शिवसेनेची जागा अडगळीत…

कणकवली :
आडाळी येथील वनौषधी संशोधन प्रकल्पाची फाईल वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आपणाकडेच दाबून ठेवलीय. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीलाही ते आले नाहीत की वनौषधी प्रकल्पाची फाईल आणली नाही. त्यामुळे आडाळीत प्रकल्प आणणारच अशा पोकळ बढाया शिवसेनेच्या आमदार, खासदारांनी मारू नयेत. आडाळीत वनौषधी प्रकल्प न झाल्यास इथली जनताच शिवसेनेला अडगळीत टाकल्याशिवाय राहणार नाही अशी टीका भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी केली.
श्री. जठार म्हणाले, शिवसेनेच्या आमदार, खासदारच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख हे राष्ट्रीय वनोषधी संशोधन प्रकल्प लातूरला नेण्यासाठी आग्रही आहेत. राज्यमंत्रीमंडळ बैठकीत आडाळीतील वनौषधी संशोधन प्रकल्पाला चालना मिळेल अशा बाता शिवसेनेच्या आमदार, खासदारांनी मारल्या होत्या. वनौषधी प्रकल्प हलवला तर आंदोलन करून, आम्ही मेलेल्या आईचे दूध प्यालेलो नाही अशाही वल्गना शिवसेनेचे आमदार, खासदार आणि पालकमंत्री करत होते. प्रत्यक्षात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी या सर्वांना धूप घातलेला नाही.
श्री. जठार म्हणाले, देशमुखांच्या खात्यातील एक अधिकारी श्री कोहली यांना मी महीनाभरापुर्वी भेटून प्रकल्प लातूर नेऊ नका तो सिंधुदुर्गसाठी आम्ही मंजुर करून आणलेला आहे असे ठणकावले. तेव्हा त्याने मला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. हा प्रकल्प तुमच्यासाठी नाही कोकणासाठी हर्बल गार्डनचा प्रकल्प आहे. मी जास्तच आरडाओरडा केल्यावर ते महाशय म्हणाले मग तुम्ही केंद्रीय मंत्री श्रीपादजी नाईक यांचे थेट पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांना आणा तरच आमचे मंत्री देशमुख ऐकतील. मी त्याचे आव्हान स्वीकारले ताबडतोब श्रीपाद भाऊंना फोन केला भाऊ म्हणाले हरकत नाही, उद्या पत्र देतो प्रकल्प सिंधुदुर्ग साठीच आहे.
श्री. जठार म्हणाले, मी भाऊंचे सदर पत्र त्या अधिकाऱ्याला दुसऱ्या दिवशी पाठवले तेव्हा तो वठणीवर आला. आता मुख्यमंत्री महोदयांना साक्षात केंद्रीय मंत्री विनंती करतात तेव्हा रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या कार्यसम्राट खासदारांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक बोलावून मुख्यमंत्री महोदयांमार्फत कॅबिनेट मंत्र्यांना बोलावून निर्देश देवून तातडीने प्रकल्पाला जागा सिंधुदुर्गात आडाळीत देण्याचे आदेश सर्व मंत्री व खात्यांना द्यायला हवे होते. तसे झाले असते तर आम्ही खासदारांना मानले असते. परंतु खासदारांना ना मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला ना अमीत देशमुखांनी. एवढेच नव्हे तर तिकडे अमीत देशमुख यांनी वनौषधी संशोधन प्रकल्पाची फाईलच दाबून ठेवली आहे. ते कॅबिनेट बैठकीलाही गेलेले नाहीत. रेल्वेने पाणी न्यावे लागले तरी चालेल पण प्रकल्प लातूरलाच नेणार असा त्यांचा आग्रह आहे. तेव्हा आता खासदार विनायक राऊत साहेब, तुमचे सोडा तुमच्या मुख्यमंत्र्याचे सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री ऐकत नाहीत हे मान्य करा. तसेच वनौषधी प्रकल्पाला लवकरात लवकर जर जागा आडाळीत मिळाली नाही तर तुमची सेना आणी तुम्ही मात्र कोकणात अडगळीत जाल हे ध्यानात ठेवा.

प्रतिक्रिया व्यक्त करा