मच्छीमारांना जाहीर पॅकेजचे कोणीही फुकाचे श्रेय घेऊ नये….

मच्छीमारांना जाहीर पॅकेजचे कोणीही फुकाचे श्रेय घेऊ नये….

मेघनाद धुरी ; पॅकेजसाठी जिल्हा मच्छीमार संघटना, काँग्रेसनेच पाठपुरावा केल्याचा दावा…

मागील मच्छीमारी हंगामात क्यार व महा चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान ग्रस्त झालेल्या मच्छीमारांना राज्य शासनाने ६५ कोटी १७ लाखांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. यासाठी जिल्ह्यातील मच्छीमार सोसायट्यांसह सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमारी सोसायटी फेडरेशनने तसेच जिल्हा काँग्रेसच्या वतीने मत्स्य मंत्री अस्लम शेख यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. या पाठपुराव्यामुळेच शासनाकडून हे पॅकेज जाहीर झाले असून यात मत्स्य मंत्री अस्लम शेख यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे कोणीही या पॅकेजची फुकाचे श्रेय घेऊ नये असा टोला जिल्हा मच्छीमार सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी लगावला आहे.

गत मच्छीमार हंगामात क्यार व महा चक्रीवादळाच्या तडाख्यात कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेल्या नुकसानग्रस्त मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ६५ कोटी १७ लाख रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी भूमिका मांडली आहे.
वादळात नुकसान ग्रस्त झालेल्या मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी जिल्ह्यातील मच्छीमारी सोसायटी तसेच जिल्हा मच्छीमार सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या गाठी भेटी घेऊन लक्ष वेधले होते. मच्छीमारांची व्यथा मांडून नुकसान भरपाईची मागणी केली होती. जिल्हा फेडरेशन अध्यक्ष या नात्याने आपण देवगड येथील तीन मच्छीमारी सोसायटींच्या शिष्टमंडळासोबत मार्च महिन्यात मत्स्य मंत्री अस्लम शेख यांची भेट घेऊन नुकसान भरपाईची मागणी लावून धरली होती. तर जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, साईनाथ चव्हाण, प्रवक्ते इर्शाद शेख व आपण असे शिष्टमंडळही अस्लम शेख यांना भेटून नुकसान भरपाई मागणीचा पाठपुरावा केला होता. सातत्याने होणाऱ्या पाठपुराव्यामुळे मत्स्य मंत्री अस्लम शेख यांनी या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या विषयाचा पाठपुरावा केला. मंत्री शेख यांच्या पुढाकारामुळे सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करून मच्छीमारांना दिलासा दिला आहे. मात्र मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कोणतेही प्रयत्न न करणारे आता पॅकेज जाहीर झाल्यावर त्याचे फुकाचे श्रेय घेऊन संभ्रम निर्माण करत आहेत. मच्छीमार सोसायट्या, जिल्हा मच्छीमार सोसायटी फेडरेशन व काँग्रेसने केलेल्या सततच्या पाठपुराव्याच्या मुळे आणि मत्स्य मंत्री अस्लम शेख यांच्या पुढाकारामुळेच हे पॅकेज जाहीर झाले आहे असा दावा मेघनाद धुरी यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा