You are currently viewing लहरी हवामानामुळे आंबा व काजू पीक संकटात…

लहरी हवामानामुळे आंबा व काजू पीक संकटात…

बागायतदारांनी काळजी घेण्याची गरज: शास्त्रज्ञांचे आवाहन….

वेंगुर्ला:

गतवर्षाप्रमाणे यावेळी पण लहरी हवामान व ढगाळ वातावरणासह झालेल्या पावसामुळे अंबा व काजू पीक पुन्हा संकटात आली आहेत. थंडीनंतर गेल्या आठवड्यात झालेला हवामान बदल व पाऊस यामुळे कोकणातील आंबा व काजू पिकांवरील रसशोषक किडींचा व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असून याचा परिणाम फळपिकांच्या पुढील उत्पादनाच्या प्रक्रियेवर होऊन यंदाचा हंगाम उशिरा व कमी उत्पन्नाचा होण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्याकरिता प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील कीटक शास्त्रज्ञ व हार्टसॅप प्रकल्प अन्वेषक डॉ. विजयकुमार देसाई व डॉ.गोपाळ गोळवणकर, संशोधन सहयोगी यांनी आंबा व काजू पीक संरक्षणाचे आवाहन केले आहे. कोकण विभागात फलोत्पादन योजनेमुळे गेल्या काही वर्षात अंबा व काजूचे लागवडीचे क्षेत्र वाढले असून सतत बदलणाऱ्या हवामानाचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रता यामुळे आंब्यामध्ये तुडतुडे, फुलकिडी, भुरी व करपा रोग तसेच काजूमध्ये ढेकण्या, फुलकिडी व करपा रोग यांचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आंबा व काजू बागायतदारांना पिकांचे वेळोवेळी सर्वेक्षण करून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सध्या आंबा बागांमध्ये कोवळी पालवी दिसून येत असून ढगाळ वातावरण कायम राहिल्यास पालवीवर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, तरी या किडीच्या व्यवस्थापनासाठी पालवीवर डेल्टामेथ्रीन २.८% प्रवाही ९ मिली किंवा तुडतुडे पिलावळ अवस्थेत असताना किटक वाढ अवरोधक बुप्रोफेझिन २५% प्रवाही २० मि.ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. थंडीच्या दिवसात लिकॅनिसीलीयम लिकानी या बुरशीचा वापर ५ ग्रॅम प्रति लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे फुलकिडींचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून नियंत्रणासाठी पालवी अवस्थेसाठी डायमेथोएट ३०% प्रवाही १० मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच ज्या ठिकाणी मिजमाशीचा प्रादुर्भाव झाला असेल तेथील प्रादुर्भावीत शेंडे खुडुन जाळून नष्ट करावेत. पुढील काही दिवसामध्ये हवामान ढगाळ राहिल्यास व तापमानामध्ये घट झाल्यास पाऊस झालेल्या आंबा बागांमध्ये भुरी व करपा रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता असून त्याकरिता पुढील उपाययोजना कराव्यात. भुरी रोगासाठी ५ टक्के हेक्‍झाकोनॅझोल ५ मिली. किंवा पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम व करपा रोगासाठी कार्बेडॅझीम १२ % + मॅन्कोझेब ६३% १० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यातून फवारावे.

तसेच काजूमध्ये नवीन पालवीवर ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून त्यासाठी नवीन पालवीची पाहणी करावी. पालवी काळपट आढळल्यास विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार लॅम्डा सायहॅलोथ्रीन ६ मिली किंवा प्रोफेनोफॉस १० मिली किंवा ॲसिटामिप्रिड ५ मिली प्रति १० लीटर पाण्यातून यापैकी एका कीटकनाशकांची फवारणी करावी. पाने पोखरणारी अळी व फुलकिडीच्या नियंत्रणासाठी ढेकण्‍यासाठी वापरले जाणारे कीटकनाशक चालते, त्यामुळे इतर फवारणी टाळावी. करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराइड २० ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉक्स १० मिली किंवा ॲसिटामिप्रिड ५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यातून यांची मिश्र फवारणी करावी. तीन ते चार तासांची पावसाची उघडीप दिसून आल्यास फवारणीच्या द्रावणात स्टीकरचा वापर करून फवारणी करावी जेणेकरून पावसामुळे कीटकनाशकांची मात्रा वाया जाणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा