You are currently viewing मालवण ‘चिवला बीच’ येथे राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा डिसेंबर मध्ये

मालवण ‘चिवला बीच’ येथे राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा डिसेंबर मध्ये

२६ जिल्ह्यातून सुमारे १५०० स्पर्धक सहभागी होणार:  राजेंद्र पालकर

मालवण:

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या वतीने बारावी (१२) राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा शनिवार १७ व रविवार १८ डिसेंबर रोजी ‘चिवला बीच’ मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत २६ जिल्ह्यातून सुमारे १५०० स्पर्धक सहभागी होणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती उद्घाटन सोहळ्यास असणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना सचिव राजेंद्र पालकर यांनी प्रसिद्धी पत्राच्या माध्यमातून दिली आहे.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवर, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे. अशीही माहिती राजेंद्र पालकर यांनी दिली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष डॉ. दीपक परब यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्यासह जिल्हा बँक संचालक बाबा परब, निल लब्दे, डॉ. राहुल पंतवालावलकर, सुनील मयेकर, युसूफ चुडेसरा, राकेश पवार व अन्य प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्पर्धेची तारीख व नियोजन करण्यात आले.

दरम्यान, दोन वर्षे कोरोना काळ वगळता गेल्या अकरा वर्षात राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमुळे मालवणचे पर्यटन बहरले. या स्पर्धेला पर्यटनाची जोड मिळाल्याने चिवला बीच अधिक नावारूपाला येत आहे. राज्यस्तरीय स्पर्धेची व्याप्ती वाढत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्पर्धकांनाही जलतरण स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध होत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनीही सहभाग घ्यावा. असे आवाहन अध्यक्ष दीपक परब यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २००९ पासून सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. चिवला बीच येथे होणारी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा ही संपूर्ण भारतातील एकमेव स्पर्धा असून या स्पर्धेत २६ जिल्ह्यातून ६ ते ७५ वयोगटातील स्पर्धक विविध १२ वयोगट स्पर्धेत सहभागी होतात. तीन पिढ्या अर्थात मुलगा/मुलगी, वडील/आई, आजी/आजोबा यांचा एकत्र सहभाग असणारी भारतातील ही एकमेव स्पर्धा असल्याचे राजेंद्र पालकर यांनी सांगितले.

दिव्यांग बांधवांसाठीही हक्काची स्पर्धा म्हणूनही ही स्पर्धा ओळखली जाते. दिव्यांग बांधव या स्पर्धेत सहभागी होत समुद्रात झेपावतात. हा स्पर्धेतील सर्वोत्तम व अभिमानास्पद क्षण असल्याचे राजेंद्र पालकर व सहकारी सांगतात.

दरवर्षी या स्पर्धेत स्पर्धक संख्या वाढती राहिली आहे. २००९ या पहिल्या वर्षी २५३ स्पर्धक असलेल्या या स्पर्धेने १० वर्षात १० हजार स्पर्धकांच्या टप्पा पार केला आहे. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला फिनिशर मेडल, सहभाग प्रमाणपत्र यासह प्रत्येक ग्रुपमधील पहिल्या १० विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय या स्वरूपात मेडल, रोख स्वरूपात बक्षिसे, टी शर्ट, प्रमाणपत्र, नॅपकीन, बॅग, वॉटरबॉटल आदी भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना तैनात असणार आहेत.

स्पर्धेसाठी मालवण येणाऱ्या स्पर्धकांचे रजिस्ट्रेशन १६ डिसेंबर रोजी मामा वररेकर नाट्यगृह येथे होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १७ डिसेंबर रोजी ५०० मीटर, १ किलोमीटर, २ किलोमीटर या सर्व ग्रुपची स्पर्धा व पारितोषिक वितरण तसेच १८ डिसेंबर रोजी ३ व ५ किलोमीटर स्पर्धा होणार आहे. त्याचेही रजिस्ट्रेशन मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणार आहे.

स्पर्धा आयोजनासाठी राज्य शासन, मालवण नगरपरिषद, सामाजिक कार्यकर्ते, आजी, माजी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी व मालवणवासीय नागरिक, स्थानिक मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक या सर्वांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वी होत आली आहे. यावेळीही स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभेल असा विश्वास राजेंद्र पालकर यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + eight =