You are currently viewing नवोदितांना व्यासपिठ मिळण्यासाठी साहित्य संमेलन

नवोदितांना व्यासपिठ मिळण्यासाठी साहित्य संमेलन

वृंदा कांबळी; वेंगुर्ला येथे त्रैवार्षिक तिसरे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

वेंगुर्ला

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या वेंगुर्ला तालुक्याला समृद्ध अशी सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक परंपरा आहे. वेंगुर्ला तालुक्यातील वि.स.खांडेकर, जयवंत दळवी, आरती प्रभू, गंगाधर महांबरे, मंगेश पाडगांवकर. म.वा.धोंड या प्रसिद्ध साहित्यिकांनी साहित्य क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे. त्यांचा हा समृद्ध वारसा पुढेही चालू रहावा, वाङ्मयीन अभिरुची वृद्धींगत करावी, लेखक, रसिक, वाचक, साहित्यप्रेमी, अभ्यासक यांनी एकत्र यावे, वेंगुर्ल्यातील नवोदितांना व्यासपिठासोबत मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने आम्ही आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आनंदयात्री वाङ्मय मंडळाचे वेंगुर्ला अध्यक्ष वृंदा कांबळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्यावतीने दि. १० व ११ डिसेंबर या कालावधीत वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालय (जयवंत दळवी नगरी) येथे वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक तिसरे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाची माहिती देण्यासाठी येथील साई डिलक्स हॉल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष वृंदा कांबळी, सचिव प्रा. सचिन परुळकर, कार्याध्यक्ष प्रा.आनंद बांदेकर, सहकार्याध्यक्ष संजय पाटील, संयोजन समिती सदस्य माधवी मातोंडकर आदी उपस्थित होते. पुढे माहिती देताना वृंदा कांबळी म्हणाल्या की, एखाद्या तालुक्याच्या नावाने घेतले जाणारे संमेलन हे या साहित्य संमेलनाचे विशेष आहे. हे संमेलन तालुकास्तरीय असले तरी जिल्ह्यातील साहित्यिकांना निमंत्रित करण्यात आले आहे. सामान्य माणसांच्या मनात साहित्याविषयी आत्मियता निर्माण करावी हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे. या मराठी साहित्य संमेलनासाठी सातेरी प्रासादिक संघ-वेंगुर्ला, बॅ.खर्डेकर महाविद्यालय-वेंगुर्ला, वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग-तुळस, किरात ट्रस्ट-वेंगुर्ला आणि माझा वेंगुर्ला आदी संस्था सहयोगी म्हणून काम पहाणार आहेत.

या संमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थी कट्टा, कथासंग्रहाचे प्रकाशन, रंग उगवतीचे कवी संमेलन, वक्तृत्व स्पर्धा, ग्रंथदिडी, सत्कार सोहळा, मनोरंजनाचा रंगतरंग कार्यक्रम, नाट्यप्रवेश सादरीकरण अशाप्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती वृंदा कांबळी यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 2 =