You are currently viewing आजगाव साहित्य कट्ट्याचा पंचविसावा कार्यक्रम उत्साहात

आजगाव साहित्य कट्ट्याचा पंचविसावा कार्यक्रम उत्साहात

सावंतवाडी :

 

“आमच्या साहित्य संगम संस्थेकडून प्रेरणा घेऊन चार वर्षापूर्वी आजगावला साहित्य कट्ट्याची निर्मिती झाली. आज हा कट्टा आपला पंचविसावा मासिक कार्यक्रम साजरा करीत आहे, ही अतिशय आनंददायी बाब आहे. कौतुक करणारे खूप भेटतात, पण कृती करणारे फारच कमी असतात. मात्र या पंचक्रोशीतील साहित्यप्रेमींनी हे करून दाखवलं. ही साहित्य संस्था अशीच बहरत जावो. एका साहित्य संस्थेतून दुसर्‍या साहित्य संस्थेची निर्मिती हीच खरी प्रेरणा”,असे गौरवोद्गार गोव्यातील साहित्य संगम संस्थेचे सचिव गजानन मांद्रेकर यांनी काढले. निमित्त होते, आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या पंचविसाव्या कार्यक्रमाचे. आजगाव वाचनालयातील ‘रुपेरी कट्टा या कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाची सुरूवात ‘मराठी असे आमुची मायबोली ‘ या माधव ज्युलियन यांच्या गीताने झाली. नंतर कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यानी प्रास्ताविक करताना कट्ट्याच्या मागील चोवीस कार्यक्रमांचा आढावा घेतला. त्यानंतर आजगाव प्राथमिक शाळेचा विद्यार्थी वैभव थडके याने ‘मोबाईलचे वेड ‘ ही कविता सादर केली, तर आजगाव हायस्कूलची विद्यार्थीनी कु. काजल मुळीक हिने ‘जागर स्त्री शक्तीचा’ ही मराठी तर ‘माणूस’ ही मालवणी स्वरचित कविता सादर केली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ममता जाधव मॅडम यांचे हस्ते काजलचा, तर हायस्कूलचे मुख्याध्यापक उत्तम भागीत सर यांचे हस्ते वैभवचा पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला. पुढील कार्यक्रमात सोमा गावडे यांनी ‘काव्य एक अभिनव अभ्यास ‘ हा काव्य विषयक दृष्टिकोन मांडला. श्रीमती सरोज रेडकर यानी वाचनाविषयी विचार मांडले. कवी स्वप्नील वेंगुर्लेकर यांनी चार कविता सादर केल्या. त्यातील ‘मृगनयना’ आणि ‘ईमान’ या मालवणी कवितांना विशेष दाद मिळाली. डाॅ.मधुकर घारपुरे यांनी ‘सावंतवाडीचा नारायण’ या खुसखुशीत ललित लेखाचे सादरीकरण केले. डाॅ.सुधाकर ठाकूर यांनी कै.आरती प्रभूंना लिहिलेल्या भावपूर्ण अनावृत्त पत्राचे वाचन केले. प्रभूंच्या सर्व लिखित साहित्याचा त्यानी आढावा घेतला. ज्येष्ठ लेखिका वृंदाताई कांबळी यानी वेंगुर्ल्यात होत असलेल्या त्रैवार्षिक साहित्य संमेलना विषयी माहिती देऊन सर्वांना त्याचे निमंत्रण दिले. विनय सौदागर यांनी दिवाळी अंकांच्या प्रवासाचा आढावा घेतला.

या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ईश्वर थडके सर यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन. त्यांच्या ‘अंतरीचे भाव’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन निवृत्त माध्यमिक शिक्षक आत्माराम बागलकर यांचे हस्ते झाले. थडके सरनी मनोगत व्यक्त केले, तर डाॅ.ठाकूर, डाॅ. घारपुरे, मांद्रेकर सर, ज्येष्ठ पत्रकार अनिल निखार्गे व कांबळी मॅडम यांनी त्याना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात सौ. वृंदाताई कांबळी यांचा वाढदिवस त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थाचे वितरण करून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कु.आर्या आजगावकर हिच्या गीत गायनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमास अनिता सौदागर, रश्मी आजगावकर, प्रिया आजगावकर, एकनाथ शेटकर, प्रा.जयंत पाटील, रविंद्र अटरे, मीरा ठाकूर, प्रकाश वराडकर, अरुण धर्णे, अनिल जोशी,प्रशांत रेगे,विशाल उगवेकर, देवयानी आजगावकर, चैताली जाधव,पुरुषोत्तम दळवी, दत्तगुरू कांबळी आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + 12 =