मनसेच्या वतीने 9 नोव्हेंबरला पोलिस अधिक्षकांकडे तक्रार दाखल करणार..
कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्ह्यत इ – स्टोर कंपनी आल्यावर मनसेच्या वतीने आम्ही या कंपनीची चौकशी व्हावी अशी मागणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे केली होती. या कंपनीने जनतेला अमिषे दाखवून जनतेचे पैसे लुटले. गेल्या एप्रिल महिन्यापासून लोकांचे पैसे येणे बंद झाले. त्यानंतर आमच्याकडे या विरोधात अनेक तक्रारी आल्या. मनसेच्या माध्यमातून याबाबत एसपींकडे तक्रार केल्यानंतर या नोव्हेंबर पर्यंत सर्व लोकांचे पैसे मिळतील असे इ स्टोर चे इंडिया हेड जाधव आणि गोवा-महाराष्ट्र चे कंपनी प्रमुख पेडणेकर यांनी सांगितले. कंपनीचे अधिकारी खान हे परदेशात जाऊन तिथल्या कंपनीशी बोलणी करत आहेत. तेथून पैसे आले की सर्वांचे पैसे मिळतील असे त्यांनी सांगितले.
मात्र त्यानंतर मनसेच्या माध्यमातून तक्रार नोंद झाली तर पैसे अडकतील असे सांगून 999 चा टॉपअप मारल्यानंतर पैसे मिळतील, असे सांगितले गेले. त्यालाही अनेक लोकं फसली. आज इ स्टोर मध्ये जिल्ह्यातील लोकांचे जवळपास शंभर कोटी रुपये थकीत आहेत. दुकानांची भाडी दिली गेली नाहीत. इ स्टोर च्या एजंटांनी लाखो रुपये कमावले आहेत. त्या एजंटांबाबत तसेच जाधव आणि पेडणेकर यांच्या विरोधात आम्ही उद्या पुन्हा एकदा एसपींकडे तक्रार देणार आहोत, असे मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी सांगितले.
कणकवली येथे मनसे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपकरकर बोलत होते. इ स्टोर कंपनी ही मुळात मेडिकल आयुर्वेदिक कंपनी असून त्यांनी त्यामधून धान्य विक्री, गृहोपयोगी वस्तूंची 33% डिस्काउंट वर विक्री करणे सुरू केले. त्यातून प्रलोभने दाखवून त्यांनी खूप पैसा कमावला. अशाच प्रकारच्या अनेक कंपन्या धान्य वितरण करणारी दुकानं घालून त्या दुकानात 1200 रुपये दिल्यानंतर 1000 रुपयांचा माल देतात आणि 200 रुपये प्रलंबित ठेऊन पुढच्या महिन्यात परत 200 रुपये टाकून 500 रुपयांचा माल फुकट घेऊन जायचा असे सांगत आहेत. तसेच दहा लाख दिल्यानंतर महिन्याला 40 हजार रुपये देणार असे म्हणत फसवणूक करत आहेत.
या प्रलोभनाला भुलून जिल्ह्यातील लोकांचे साधारण तीन हजारांपासून पस्तीस लाखांपर्यंत असे साधारण शंभर कोटी रुपये इ स्टोर मध्ये गुंतले आहेत. त्यासाठी आता लोकांनी एकत्र येऊन अशा कंपनी विरोधात पुढे येण्याची गरज आहे. गुंतवणूकदारांकडे असलेल्या कोडच्या माध्यमातून सारी माहिती एकत्र करून एसपींकडे देण्यात येईल. कंपनीचे प्रमुख जाधव, शैलेश पेडणेकर तसेच इतर एजंटांवर गुन्हा दाखल करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनवर या विरोधात तक्रार देण्यात यावी. या कंपनीचे प्रमुख दोन ते अडीच हजार कोटी रुपये घेऊन परदेशात गेले आहेत. या विरोधात मनसे आवाज उठवत आहे. त्याला नागरिकांनी आणि गुंतवणूकदारांनी साथ द्यावी, असे आवाहन यावेळी परशुराम उपरकर यांनी केले.