You are currently viewing सामाजिक नवदुर्गा… लतिका सुप्रभा मोतिराम

सामाजिक नवदुर्गा… लतिका सुप्रभा मोतिराम

आजच्या नवदुर्गा आहेत लतिका सुप्रभा मोतिराम
आजपासून नवरात्रोत्सव आपण थाटामाटाने साजरा करणार आहोत. स्त्रीशक्तीचा, आदिशक्तीचा, देवीचा आपण जागर करणार आहोत, दुर्गादेवीची पुजा, उदोउदो करणार आहोत. आदिशक्ती म्हणजे विश्वाची जननी. शांत ,प्रेमळ, मायाळू, सोज्वळ, प्रसन्न रुप. तिचा महिमा, तिचे गुणगान गाताना आपण आजूबाजूला नजर टाकली तर या आदिशक्तीचा अंश असणाऱ्या कितीतरी स्त्रिया आपल्या अवतीभवती असतात. आदिशक्ती देवीप्रमाणे या महिला समोर संकट उभ राहिल तर कधी रणरागिणी, तर कधी रणचंडी, महिषासुरमर्दिनी बनतात. तर काही जणी समाजातील दैन्य, दुःख,व्यथा पाहून विव्हळ होतात. स्वतःच कुटुंब, संसार सांभाळून समाजातील गरीब, दुर्लक्षित मुलांकडे, स्त्रीयांकडे मदतीचा हात पुढे करतात. समाजातील अशा दिव्यत्वाचा अंश असणाऱ्या स्त्रीया दुर्गेच, आदिशक्तीच प्रतिक असतात. अशा सामाजिक कार्याला वाहून घेणाऱ्या, सतत समाजभान, समाजऋण यांचा जागर करणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्या दुर्गेचा आपण आजपासून परिचय करून घेणार आहोत. या दुर्गा मुळातच आपल्या सारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्रीया असतात. त्यांना आपण करत असलेल्या कार्याची जाणीवही फारशी नसते किंवा आपण खूप मोठ काम करतो हा अविर्भाव नसतो.समाजऋण म्हणून तळमळीने अशा स्त्रीया समाजातील वंचितांना योग्य न्याय मिळावा, मुलांना योग्य शिक्षण मिळावे म्हणून सतत धडपड करत असतात. अशा नवदूर्गांची ओळख आपण नवरात्रातील नवू दिवसात करुन घेतानाच त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करुन त्यांच्यातीलआदिशक्तीला अभिवादन करणार आहोत.
आजच्या आपल्या दुर्गा आहेत… सौ.लतिका सुप्रभा मोतीराम.. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या लतिकाताई स्वतः ९वीत शिकत असताना मुलांना गणित, विज्ञान शिकवत असत. पुढे अकरावीला असताना बाबा आमटे यांच्या श्रमदान शिबिरात त्या दाखल झाल्या आणि आपणही समाजासाठी काहीतरी केल पाहिजे याची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देईना तेव्हा त्या
राष्ट्रसेवादलात सामिल झाल्या. काँलेजमधे असतानाच सफाई कामगारवस्तीमध्ये जाऊन त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवायला सुरवात केली. तेव्हाच त्यांच्या लक्षात आले की आईवडील कामावर गेल्यावर मुल शाळेत जात नाहीत, तर काहींना शाळेतच घातले गेले नाही. मुलांना अभ्यासाची गोडी लागत नाही. वस्तीतील वातावरण, व्यसनाधीनता इ.मुळे मुल शाळेत टिकतच नाहीत. त्यांनी स्वतः मुलांना शाळेत नावनोंदणी करुन दाखल केले, “वस्ती तिथ बालवाडी या मागणीसाठी मुलांना घेऊन पाटी मोर्चा काढला.”पाटी अन पेन्सिल घेऊ द्या की रं..मला बी शाळला येऊ द्या की रं.” या तालावर जवळपास ८५ वस्त्यांमध्ये सर्व्हे करुन सहा बालवाड्या सुरु केल्या.
मुलांना शाळेत प्रवेश मिळवून दिला तरी ती मुले शाळेत जातात की नाही हे पहाणे, अभ्यास करण्यासाठी त्यांना मदत म्हणून वस्ती , वस्तीत जाऊन शिकवण्या घेणे, दहावी पर्यंत मुले शाळेत गेलीच पाहिजेत म्हणून लतिकाताई सतत मुलांशी पालकांशी संपर्कात रहात होत्या.
जेथे जळते बाई तेथे प्रगती नाही” या न्यायाने परिकत्त्या मुक्ती यात्रेत सहभाग, आईचे नाव मुलांच्या नावापुढे असलेच पाहिजे ही लढाई, तसेच परिकत्त्या स्त्रीयांना रेशन कार्ड मिळालेच पाहिजे यासाठी प्रयत्न करुन ती
मागणी मान्य करुन घेतली. मोफत महिला सल्ला केंद्र चालवले.
अशा अनेक सामाजिक तळमळतून पुढे १९९२ साली त्याचे पती प्रा.श्री.संजय मंगला गोपाळ जगदिश खैरालिया, विरपाल भाल यांच्या पुढाकाराने समता विचार प्रसारक संस्थेची स्थापना झाली.
या यासंस्थेचा प्रसार करणे, वस्तीतील मुलांना एकत्र करुन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, त्यांनी किमान १०वीपर्यत शिक्षण घ्यावे यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा करणे हे त्यांच धेय्यच झाले. १०वीतील जी मुले गरीबीमुळे कोचिंग क्लासला जाऊ शकत नाहीत त्यांना गणित, विज्ञान विषय सोपे करुन शिकवणे लतिकाताई गेले २५ वर्ष करतात.
मुलांना अभ्यासात अडचणी येऊ नयेत म्हणून त्या वस्तीमधे घरोघरी जाऊन अडचणी समजावून घेतात. मुलांच्या प्रगतीचे, गुणदान किंवा प्रगतीपुस्तक हे मापनदंड न ठेवता घरची परिस्थिती,वातावरण, फेस कराव्या लागणाऱ्या समश्या या गोष्टी लक्षात घेऊन त्यांना उत्तेजन देणे हे एक समता विचार प्रसारक संस्थेचे वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यासाठी संस्थेने एकलव्य पुरस्कार देण्यास सुरुवात केली.आणि लतिकाताई नव्या जोमाने वस्तीतील एकलव्य शोधून त्यांना उत्तेजन देऊ लागल्या. इतकेच नव्हे तर प्रत्येक वस्तीतील घरात दहावीचा विद्यार्थी असेल तर परीक्षेपूर्वी पेन आणि गुलाब देऊन शुभेच्छा ही देण्यासाठी त्या जातात.२०१४पासून वंचितांच्या मुलांचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून “स्लमथिएटर” अर्थात नाट्यजल्लोश हा अभिनव उपक्रम कै.रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून सुरु केलाय. एकलव्य मुलांच्या विकासासाठी पुस्तक पेढी, कमवा आणि शिका, खादी वापरा, ईद आणि दिवाळी संमेलन, एकलव्य पुरस्कार योजना,१०दिवसाचे दहावी झालेल्या मुलांसाठी मोफत शिबिर आणि विविध कला, क्षमता विकास, करियर संधी ज्ञान या शिबीरातून दिले जाते.वाचनकट्टा वस्ती मधे चालवला जातो.
सावित्रीबाई फुले व्याख्यानमाला प्रत्येक वस्तीमधे दरवर्षी होते. एवढ मोठ प्रचंड कार्य त्या त्यांचे पती श्री. संजय मंगला गोपाळ आणि अनेक सहकारी, एकलव्य विद्यार्थी तसेच कार्यकर्त्यासह करतात. समाजकार्याच्या या ध्यासापायी त्यांनी नोकरी, घर सांभाळून संस्थेसाठी त्या काम करत असत. आता निवृत्त झाल्यावर त्यांनी पूर्ण वेळ संस्थेला वाहून घेतलय.
अशा या सामाजिक कार्यकर्त्या दुर्गेस आम्ही लेखिकाकडून मानाचा मुजरा🙏

सौ.मानसी मोहन जोशी
आम्ही लेखिका कार्यवाह
ठाणे जिल्हा

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + seventeen =