You are currently viewing आंगणेवाडी भराडी मंदिर परिसराचा सुरू आहे कायापालट

आंगणेवाडी भराडी मंदिर परिसराचा सुरू आहे कायापालट

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा विशेष लक्ष;आंगणेवाडी मुंबई विकास मंडळ अध्यक्ष, कार्यवाह यांनी मानले आभार

मालवण

कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवी मंदिर परिसर व संपूर्ण आंगणेवाडीचा नागरी सुविधा आणि शाश्वत विकास कामांद्वारे कायापालट होत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वतः लक्ष घातले असून आंगणेवाडीत अनेक विकासात्मक कामे करण्यात येणार आहेत. पालकमंत्र्यांच्या या कार्यतत्परतेबाबत आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबईतर्फे अध्यक्ष भास्कर आंगणे, प्रमुख कार्यवाह मधुकर आंगणे यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

आंगणेवाडी भराडी देवीवर अपार श्रद्धा असणारे, आंगणे कुटुंबियांचे स्नेही चव्हाण यांनी पालकमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्याच दौऱ्यात आंगणेवाडी येथील भराडी मातेचे दर्शन घेतले. त्यांनी आंगणेवाडीच्या समस्या जाणून घेतल्या. शासकीय अधिकाऱ्यांना आंगणेवाडीतील विकास कामांसाठीचे सर्व प्रस्ताव तात्काळ तयार करण्याचे आदेश दिले. या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे सांगत आंगणेवाडी यात्रेपूर्वी सर्व कामे पूर्ण करायची आहेत, या विचारानेच कामाला लागा, अशा सूचनाही दिल्या होत्या. पालकमंत्र्यांचे आंगणे कुटुंबिय, ग्रामस्थ व आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबईने प्रसिद्धी पत्रकाद्वारे आभार मानले आहेत. आंगणेवाडी विकास मंडळाने या कामात शासनाला मंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या सहकार्यात सुसूत्रता यावी, काम जलदगतीने व्हावे म्हणून मंडळाचे) सहकार्यवाह अर्जुन उर्फ काका आंगणे कामाची जबाबदारी यांच्याकडे या कामाची सोपविली आहे.

आंगणेवाडीत येणाऱ्या यात्रेकरूंचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी पालकमंत्री चव्हाण यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या ताब्यातील दोन इतर जिल्हा मार्ग व एक ग्रामीण मार्ग दर्जोन्नत करून सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या ताब्यात घेतले आहेत. त्यापैकी काही महत्वपूर्ण रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे बनविण्यात येणार आहेत. त्यात आंगणेवाडी मार्गे जाणाऱ्या रस्त्याला महत्वपूर्ण दर्जा आणि प्राधान्य देऊन सिमेंट कॉंक्रिटचा करण्याचे ठरविले आहे. यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेची मदत घेण्यात येईल. कुडाळ, मालवण व कणकवली येथून आंगणेवाडीकडे येणारे सर्व छोठे मोठे रस्ते आंगणेवाडी यात्रेपूर्वी हॉट मिक्सिंग डांबरीकरण करून मजबूत करण्यात येणार आहेत. अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त सुलभ शौचालय बांधणे, आंगणेवाडी येथे शवदाहिनी व स्मशानशेड बांधणे, सर्व ओव्हरहेड वीज वाहिन्या भूमिगत करणे, विद्युत सबस्टेशन करणे, आंगणेवाडी-मसुरे रस्त्यावर पथदीप, भोगलेवाडी येथील मोडण धरण परिसर तसेच पार्किंग परिसरात पथदीप बसविणे, मोडण झऱ्यावर तलाव बांधणे, सुसज्ज पर्यटक निवास बांधणे, मोबाईल सेवेसाठी जीओ मोबाईल टॉवर उभारणे इत्यादी प्रकल्प पालकमंत्र्यांनी हाती घेतले आहेत. पालकमंत्र्यांनी भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य नीलेश तेंडुलकर यांना सर्व शासकीय विभागांशी संपर्क साधून विकासकामांबाबत सर्व आराखडे बनवून घेण्याची सूचना दिली होती. त्यानुसार ते पाठपुरावा करत कामे पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, उपअभियंता अजित पाटील, शाखा अभियंता प्रदीप पाटील, महावितरणचे अभियंता भगत, मुगडे, मृद व जलसंधारण विभागाचे भूषण नार्वेकर या सर्वांनी आंगणेवाडी परिसराची पाहणी करून माहिती घेतली.

यावेळी भाजपचे कोषाध्यक्ष चारुदत्त देसाई, कुडाळ तालुका सरचिटणीस योगेश बेळणेकर, आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबईचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ गजानन आंगणे, नारायण आंगणे, सीताराम आंगणे, अनंत आंगणे, नंदकुमार आंगणे, दिनेश आंगणे, जयेश आंगणे, दत्तात्रय आंगणे, तुषार आंगणे, गणेश आंगणे, जयवंत आंगणे, देवेंद्र आंगणे, किशोर आंगणे, महेश आंगणे, समीर आंगणे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =