You are currently viewing फेक कॉलला व्यापाऱ्यांनी बळी पडू नये – नितीन वाळके

फेक कॉलला व्यापाऱ्यांनी बळी पडू नये – नितीन वाळके

मालवण

हॉटेल वा अन्य व्यावसायिकांना “फूड ऑफिसर बोलतोय”, असा बनावट फोन येत असून समोरची फोनवरील व्यक्ती धमकी देऊन व्यावसायिकाकडून पैशाची मागणी करत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे घाबरून जाऊन अशा प्रकारच्या फसवणुकीला व्यापारी बांधवांनी बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी केले आहे.

या संदर्भात वाळके यांनी सांगितले, आज सकाळीच आमच्या एका सहव्यावसायिकाला फोन आला, ‘मी फूड ऑफिसर बोलतोय. तुमच्याविरुद्ध खात्याकडे एका महिलेने तक्रार केली आहे. परवा ती तुमच्याकडे जेवायला आली होती. त्यानंतर तिची तब्येत बिघडली. तिच्याशी बोलून प्रकरण मिटवून टाका, अन्यथा आज दुपारी बारानंतर तुमचे फूड लायसन्स रद्द करावे लागेल. शिवाय तुम्हाला पंचवीस हजाराचा दंड होईल आणि हॉटेल सील करावे लागेल.’ या फोनमुळे तो घाबरलेला युवा व्यावसायिक व्यापारी संघाकडे आला. तो योग्य निर्णय घेऊन व्यापारी संघाकडे आला म्हणून सुटला, अन्यथा मांडवलीच्या नावाखाली लुटला गेला असता. त्याला धीर देत आम्ही सल्लाही दिला, परत फोन आला की काय ते करून घे, म्हणून सांग. त्यामुळे अशा घटना वारंवार घडण्याची शक्यता असल्याने व्यापारी बांधवांनी सावध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

गेल्या वर्षी एका मेडिकल दुकानदारालाही असेच फसविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यालाही असाच एका महिलेचा फोन आला आणि ‘तुमच्याकडून नेलेल्या सप्लिमेंटरी फूडमुळे माझ्या मुलीला त्रास झाला. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले. मला २५ हजार रुपये खर्च झाला. माझी नुकसान भरपाई द्या अन्यथा मी फूड डिपार्टमेंटकडे तक्रार करणार’ अशी धमकी तिने दिली होती. थोड्या वेळाने फूड इन्स्पेक्टर बोलतोय म्हणून सांगत परत त्या औषध दुकानदाराला फोन आला आणि असेच ‘त्या बाईचे काय ते भागवा, नाही तर लायसन्स रद्द करावे लागेल,’ अशी धमकी दिली. तो मेडिकल दुकानदारही असाच घाबरून व्यापारी संघाकडे आला म्हणून सुटला. आताप्रमाणे तेव्हाही परत फोन आला नाही. त्यामुळे सर्वांनी साधव व्हावे, असेही वाळके यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =