मराठा आरक्षणाला स्थगितीनंतर सुप्रीम कोर्टात पहिली सुनावणी 27 ऑक्टोबरला

मराठा आरक्षणाला स्थगितीनंतर सुप्रीम कोर्टात पहिली सुनावणी 27 ऑक्टोबरला

नवी दिल्ली :

राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेल्या मराठा आरक्षण खटल्यात सुप्रीम कोर्टातील पुढची सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतरची ही पहिली सुनावणी आहे. 9 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्याची मागणी मान्य करतानाच आरक्षणाला स्थगिती दिली होती. या निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला.. त्यानंतर राज्यात या मुद्द्यावरून राजकीय वादळ उठलं.

महाराष्ट्र सरकारच्या वतीने आणि या प्रकरणातले याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी हे प्रकरण तातडीने पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे लागावं आणि आरक्षणावरची स्थगिती उठवावी या मागणीसाठी अर्ज केला.

त्यामुळे आता या खटल्यात 27 तारखेला नेमकं काय होतंय? स्थगिती उठवण्याबाबत काही निर्णय होतोय का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.
मागच्या सुनावणीत हे प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे द्यायची मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली होती. मात्र तरीही हे प्रकरण सध्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे लागलेलं आहे. त्यातही ज्या न्यायमूर्ती नागेश्‍वर राव यांनी मराठा आरक्षणाला स्थगितीचा निर्णय दिला होता त्यांच्याच खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार आहे. प्रकरण एकदा मोठ्या खंडपीठाकडे गेलेले असताना ते पुन्हा तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे लागणं हे काहीसं आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया या प्रकरणाशी संबंधित काही वकिलांनी दिली. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या स्थगिती उठवण्याबाबत आता 27 तारखेला काही निर्णय होतोय का खंडपीठ यावर काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे असेल

प्रतिक्रिया व्यक्त करा