You are currently viewing नवरात्रोत्सवात ६ कोटी ४५ लाख ७७ हजाराचे ८०५ जणांना कर्ज वितरण

नवरात्रोत्सवात ६ कोटी ४५ लाख ७७ हजाराचे ८०५ जणांना कर्ज वितरण

जिल्हा बँकेचे लक्षवेधी काम;सर्वाधिक कर्ज प्रस्ताव करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केला सत्कार

ओरोस

उत्सव नवरात्रीचा उत्सव महिला सक्षमीकरणाचा योजनेंतर्गत जिल्हा बँकेने 805 लाभार्थ्यांना 6 कोटी 45 लाख 77 हजार रुपयाचे कर्ज वितरीत केले. दरम्यान बँकेच्या अंतर्गत महिला कर्मचाऱ्यासाठी जास्तीत जास्त कर्जदारापर्यंत पोहोचण्यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत नेरुर शाखेच्या शाखाधिकारी युगा पेडणेकर यानी प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी याच्या हस्ते पैठणी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

घटस्थापना ते दसरा या कालावधीत जिल्हय़ात साजरा झालेल्या नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बचत गटाना सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून “उत्सव नवरात्रीचा, उत्सव महिला सक्षमीकरण” हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर याच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 5 कोटीचे उिद्दष्ट देण्यात आले होते.

हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा बँकेने बँकेअंतर्गतच्या महिला कर्मचाऱ्यासाठी जास्तीत जास्त कर्जदारापर्यंत पोचण्याची आणि कर्ज खातेदाराची संख्या वाढविण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. तसेच पहिल्या तीन क्रमांकासाठी बक्षिस जाहिर करण्यात आले होते.

कुडाळ तालुक्यातील नेरुर शाखेच्या शाखाधिकारी युगा पेडणेकर यांनी 74 प्रकरण पूर्ण केली असून 1 कोटी 1 लाख 65 हजार रुपयाचे कर्ज वाटप केले. या स्पर्धेतील त्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. सावंतवाडी तालुक्यातील तळवडे शाखेच्या सुनेला शिंदे यानी 47 प्रस्ताव केले असून 28 लाख ५० हजार रुपयांचे कर्ज वितरण केले. त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी शाखेच्या निता दळवी यानी 46 कर्ज प्रकरणे केली असून 27 लाख २० हजार रुपयांचे कर्ज वितरीत केले. तर याच शाखेतील अनुजा सावंत यानी 45 प्रकरणे करुन २५ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज वितरण केले. या सर्व जिल्हा बँक अधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आ नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बँक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांच्यासह संचालक, अधिकारी उपस्थित होते.

या कालावधीत जिल्हा बँकेने 805 लाभार्थ्यां पर्यंत पोचली असून 6 कोटी 45 लाख 77 हजार रुपयाचे कर्ज वितरण केले. यामध्ये बचतगट 80 प्रस्ताव, 1 कोटी 61 लाख 60 हजार, स्वप्न पूर्ती गृहउद्योग कर्ज योजना 560 प्रस्ताव अंतर्गत 2 कोटी 74 लाख 55 हजार, महिला उन्नती कर्ज योजना अंतर्गत 88 प्रस्तावातून 1 कोटी 14 लाख 50 हजार, वैयक्तिक कर्ज योजना अंतर्गत 59 प्रस्तावातून 53 लाख 47 हजार, तर वाहन कर्ज योजनेंतर्गत 18 प्रस्ताव करण्यात आले असून 41 लाख 65 हजार रुपयाचे कर्ज वितरण करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 5 =