You are currently viewing जिल्हा परिषदेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय विचाराधीन – ना.केसरकर

जिल्हा परिषदेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय विचाराधीन – ना.केसरकर

 

जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पटसंख्येचा महत्वाचा प्रश्न सतावत आहे.पालकांची मानसिकता इंग्लिश मिडीयम शाळांची आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेच्याही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करता येतील का याबाबत गांभीर्याने विचार केला जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजेच.त्याबरोबरच त्याठिकाणी भेडसावणाऱ्या शैक्षणिक व भौगोलिक समस्यां दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री ना.दीपक केसरकर यांनी शिक्षण विभागाचे सचिव आणि सर्व अधिकाऱ्यांना दिले.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सर्व शिक्षण अधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,शिक्षण संस्था,शिक्षक,विद्यार्थी यांची ऑनलाइन सभा आज घेतली.या सभेत ना.केसरकर यांनी सर्वांशी संवाद साधत समस्या,उपाय आणि कारणे ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
विद्यार्थ्यांनीही या चर्चेत सहभाग घेत आपल्या समस्या आणि शैक्षणिक अडचणी सांगितल्या.यावेळी मंत्री केसरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या लवकरात लवकर दूर करण्यात येतील ही ग्वाही दिली.
राज्यात शाळांना भेडसावणारी इमारत दुरुस्ती आणि छप्पर दुरुस्ती यावर बोलताना ना.केसरकर यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा आणि इतर अशा नादुरुस्त शाळांचे प्रस्ताव तात्काळ पाठवण्याच्या सूचना केल्या.तसेच छप्पर दुरुस्तीसाठी पत्रे व त्यावर कौले घालावीत,जेणेकरून पावसाचा पडण्याचा आवाज येणार नाही आणि गळतीही होणार नाही असे स्पष्ट केले.
पोषण आहार संदर्भात उपस्थित प्रश्नावर ना.केसरकर म्हणाले,विद्यार्थ्यांना रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो.ही विद्यार्थ्यांची उदासीनता लक्षात घेऊन कधी इडली सांबार, खिचडी असे प्रकार उपलब्ध करून देता येतील का?कधी अंड्यांची आमटी देता येईल का(नॉनव्हेज विद्यार्थ्यांसाठी) आणि शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी आमटीमध्ये बटाटे पुरवता येतील का याबाबत विचार करावा अशा सूचना शिक्षण विभागाला केल्या.
विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत बदल करावा अशी मागणी केली असता त्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल.केवळ अभ्यास नको तर क्रीडा मध्येही विकास होण्याच्या दृष्टीने शाळेत क्रीडा शिक्षक सर्व क्रीडा प्रकारचे मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध करून देऊ,यासाठी शाळेच्या वेळेत नक्कीच बदल करण्यासाठी प्रयत्न करू असे स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड कशी निर्माण होईल?असा प्रश्न शिक्षण विभागाला पडला आहे.यासाठी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्याचा मानस असल्याचे ना.दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.
शिक्षक भरती बाबत सरकार गांभीर्याने विचार करत असून लवकरच शिक्षकभरती केली जाईल असेही ना.केसरकर यांनी स्पष्ट केले.
ज्या शाळांत डोंगराळ प्रदेशामुळे वीज कनेक्शन नसेल त्या शाळांना सोलार प्रकल्पाच्या माध्यमातून वीज देता येईल का याची पडताळणी करण्याचे आदेश ना.केसरकर यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा