You are currently viewing जिल्हा परिषदेच्यावतीने १५ रोजी साजरा होणार हात धुवा दिन

जिल्हा परिषदेच्यावतीने १५ रोजी साजरा होणार हात धुवा दिन

सिंधुदुर्गनगरी

१५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने यावर्षी सिंधुदूर्ग जिल्हयांत सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यांत येणार आहे. या दिवसाच्या संकल्पनेला धरुन अन्न स्वच्छता, हात धुण्याच्या महत्त्वाच्या वेळा म्हणजे स्वयंपाक करण्यापुर्वी, स्वयंपाक झाल्यावर शौच विधीहून आल्यानंतर बाळाची शी धुतल्यानंतर, जेवणापूर्वी जेवणानंतर इत्यादी बाबीसंदर्भात लोकशिक्षण घडवून आणण्यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून गावस्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे.

जागतिक हात धुवा दिनांचे औचित्य साधुन १५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गाव, शाळा व अंगणवाडी येथे हात धुण्याचे प्रात्यक्षिक केले जाणार आहे. विशेष शालेय स्तरावर करुन मुलांना हात धुण्याच्या पध्दती, हात धुण्याचे फायदे, स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यांत येणार आहे. तसेच जागतिक हात धुवा दिनाच्या औचित्याने विदयार्थ्यांची जनजागृती रॅली, विविध कार्यक्रमांचे आयोजन शालेय स्तरावर करण्यांत येणार आहे. तसेच जागतिक हात धुवा दिवस ग्रामपंचायतीसह सर्व पंचायत समिती, गट शिक्षणाधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात साजरा करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा